50 वर्षात आरोग्य गुंतवणुकीत सरकारी बोंब!

संगमनेर| Sangmner|संदीप वाकचौरे

राज्यात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर आरोग्य विभागाची वाताहत झाल्याचे समोर आले. पन्नास वर्षात या क्षेत्राकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षाचा तो परिपाक आहे. या काळात सार्वजनिक, स्थानिक संस्था व विश्वस्त संस्था यांच्यावतीने देण्यात आलेल्या आरोग्य सुविधेत फारशी वाढ झालीच नाही.

राज्यात अवघ्या 1100 रुग्णालयांची भर पडली. 1971 साली एक लाख लोकसंख्येमागे 88 खाटा उपलब्ध होत्या, हीच संख्या 2019 मध्ये 102 खाटांपर्यंत पोहचली. म्हणजे पन्नास वर्षांत एकीकडे लोकसंख्या विस्फोट होत असताना केवळ प्रतिलाख लोकसंख्येमागे केवळ 14 खाटांची भर पडली.

राज्यात 1971 साली 1372 दवाखाने, 388 आरोग्य केंद्रे अस्तित्वात होते. त्यावर्षी राज्यात अवघे एक प्राथमिक आरोग्य पथक अस्तित्वात होते. त्यावेळी राज्यात एकूण 43 हजार 823 खाटांची संख्या उपलब्ध होती. हे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे अवघे 88 होते.

राज्यातील आरोग्य व्यवस्थेकडे सुमारे पन्नास वर्ष दुर्लक्ष झाल्याचे परिणाम आपण सध्या भोगत आहोत. 2019 सालापर्यंत ही संख्या 1402 रुग्णालय, 3087 दवाखान्यांपर्यंत वाढविण्यात यश आले. त्याचबरोबर 10 हजार 668 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि 1828 आरोग्य केंद्र अस्तित्वात आली.

199 प्राथमिक आरोग्य पथके 5 हजार 337 क्षयरोग रुग्णालये आणि चिकित्सालयांची संख्या झाली. 2019 पर्यंत राज्यात सर्व मिळून 1 लाख 27 हजार 943 इतक्या खाटा निर्माण झाल्या. मात्र तरिही एक लाख लोकसंख्येमागे हे प्रमाण अवघे 102 इतकेच आहे. विशेष म्हणजे 1991 मध्ये हे प्रमाण प्रतिलाख लोकसंख्येला 144 खाटा असे होते. नंतर हे प्रमाण वाढण्याऐवजी घटत गेले.

राज्यात शिक्षण व आरोग्य ही शासनाची जबाबदारी आहे. अधिक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होण्याची गरज असताना पन्नास वर्षात राज्याच्या आरोग्य क्षेत्रात प्रभावात्मक वाढ झालेली दिसून येत नाही. मात्र गेल्या काही वर्षात राज्यात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या, रुग्णालयांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. खाजगी व्यवसायिक आरोग्य सुविधा देत असले तरी सामान्य जनतेला त्यांचे दर परवडणारे नाहीत. करोना काळात ते अधिक ठळक झाले. त्यामुळे सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी केंद आणि राज्य सरकारला आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक सातत्यपूर्णरित्या वाढवावी लागणार आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *