Wednesday, April 24, 2024
Homeनगरप्रत्येकाची आरोग्य कुंडली आता मोबाईलवर

प्रत्येकाची आरोग्य कुंडली आता मोबाईलवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारकडून देशभर आरोग्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात आता आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (आभा) अर्थात डिजिटल हेल्थ कार्ड लाँच करण्यात आले आहे. या कार्डद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यसंबंधित माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असणार आहे. या कार्डची नोंदणी करताना आजार आणि त्यावर उपचार याबाबत माहिती घेतली जाणार असून, आतापर्यंत नगर जिल्ह्यात 7 लाख 90 हजार नागरिकांनी हेल्थ कार्ड काढल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

आभा हेल्थ कार्ड काढणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल, औषधांचे प्रिस्क्रिप्शन, रक्तगट, डॉक्टरांची माहिती आदी सर्व माहिती कार्डमध्ये संग्रहित होणार आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती रुग्णालयात गेल्यानंतर किंवा त्याला उपचारांची गरज असताना त्या व्यक्तीचे वैद्यकीय रिपोर्ट किंवा डॉक्टरांनी दिलेले औषधांचे प्रिस्क्रिप्शन (दररोज सुरू असलेल्या औषधांची माहिती) सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.

आभा हेल्थ कार्ड काढण्यासाठी एनडीएचएम.जीओव्ही. इंन या संकेत स्थळाला भेट घ्यावी. क्रिएट आभा आयडी यावर क्लिक करावे. आधारकार्ड व मोबाईल क्रमांक टाकल्यास मोबाईलवर ओटीपी येऊन कार्ड जनरेट होते. मोबाईलवरही सहज हे कार्ड काढता येते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपक्रेंद्रे, ग्रामीण रुग्णालय, तसेच शहरातील दवाखान्यांतही आभा हेल्थ कार्ड काढण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये देखील याबाबत माहिती मिळते. आभा कार्डधारकांना 14 अंकी क्रमांक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कार्ड काढलेल्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. याचा फायदा उपचारासाठी गेल्यानंतर कार्ड काढलेल्या सर्वच व्यक्तींना होणार आहे. देशभरात कुठेही हे कार्ड आरोग्याशी संबंधित माहितीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना वाट पाहावी लागणार नसून वेळीच उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या