Friday, April 26, 2024
Homeनाशिकयेवला तालुक्यात आरोग्य विभागाच्या इमारती मोडकळीस; सेवकांची नेमणूक करा : गायकवाड

येवला तालुक्यात आरोग्य विभागाच्या इमारती मोडकळीस; सेवकांची नेमणूक करा : गायकवाड

येवला । Yeola (प्रतिनिधी)

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र राजापूर, भारम, उपकेंद्र देवठाण, एरंडगाव, निमगाव मढ, भुलेगाव या गावांना शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन इमारती बांधल्या आहेत. सेवक नसल्याने या सर्व इमारती धूळ खात पडून आहेत.

- Advertisement -

या केंद्राला तत्काळ डॉक्टर व इतर आवश्यक सेवक उपलब्ध करून द्यावे याकरता जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अहिरे यांना लक्ष घालून शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती येवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेमार्फत राजापूर, भारम, उपकेंद्र देवठाण, एरंडगाव, निमगाव मढ, भुलेगाव येथे सुसज्ज दुमजली कुटुंबकल्याण उपकेंद्र बांधण्यात आले आहे. या उपकेंद्राचे रंगरंगोटीसह कामे पूर्ण झाली आहेत. माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटनेही झाली आहेत.

हे उपकेंद्र उभारण्यास शासनाला कोट्यवधी रुपये खर्च आला. स्वागतकक्ष, तपासणी कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, औषध विभाग, रुग्ण उपचार कक्ष व डॉक्टरांसाठी दुसर्‍या मजल्यावर स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. काही उपकेंद्रांच्या परिसरात पथदीप बसवण्यात आले आहेत. परंतु ते आजपावेतो बंद अवस्थेत आहेत.

या कुटुंबकल्याण उपकेंद्रासाठी आजपर्यंत एकही चौकीदार अथवा स्वच्छता सेवकाची नेमणूक केलेली नसल्यामुळे ही रुग्णालये धूळ खात पडून आहेत. काही गावांत विघ्नसंतुष्ट लोकांनी या रुग्णालयाच्या खिडक्यांच्या आकर्षक काचाही फोडल्या आहेत. रुग्णालयाच्या सुसज्ज इमारती झाल्या, मात्र रुग्णालयात अधिकारी व सेवकांची नेमणूक केलीच नाही. तर या सुसज्ज अन् सुंदर अशा इमारतीची दुर्दशा होत आहे.

या गावातील दवाखाने सुरू झाल्यास परिसरातील महिलांच्या प्रसूतीची सोय या ठिकाणी होईल. तसेच इतर आजारांवरही प्रथमोपचार या ठिकाणी केले जातील. त्यामुळे सामान्य रुग्णांना दिलासा मिळेल. रुग्णालय असूनही अधिकारी व सेवक नसल्याने परिसरातील महिलांना तालुक्याच्या ठिकाणी खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी जावे लागते.

अशा रुग्णालयांचा खर्च सामान्य कुटुंबांना पेलवत नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या उपकेंद्रासाठी अधिकारी व सेवक उपलब्ध करून देऊन रुग्णालयाची सेवा सुरू करावी, अशी मागणी सभापती गायकवाड यांनी केली आहे.

येवला तालुक्यातील आरोग्य विभागाच्या असलेल्या रिक्त जागा तत्काळ भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा. ग्रामीण भागातील आरोग्याची सेवा मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे. त्यामुळे कंत्राटी का होईना ही पदे तत्काळ भरली पाहिजे. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यसेवा पुरवण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करावा. आपण जिल्ह्याच्या आरोग्य अधिकारी असल्यामुळे तत्काळ शासनाकडे पाठवावा.

प्रवीण गायकवाड, सभापती, पंचायत समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या