Tuesday, April 23, 2024
Homeधुळेजिल्ह्यात 14 लाख नागरिकांची आरोग्य तपासणी

जिल्ह्यात 14 लाख नागरिकांची आरोग्य तपासणी

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यातील 14 लाख 1 हजार 975 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

या तपासणीतून 713 नागरिकांना पुढील आरोग्य सेवेसाठी संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब- माझी जबाबदारी ही मोहीम 15 सप्टेंबरपासून सुरू केली आहे. या मोहिमेस धुळे जिल्ह्यात सुरवात झाली आहे.

आरोग्य तपासणीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 702 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाची पथके धुळे जिल्ह्यातील 668 गावांतील तीन लाख 41 हजार 91 घरांना भेट देवून 16 लाख 85 हजार 89 नागरिकांची तपासणी करणार आहेत.

धुळे तालुक्यात 168, साक्री तालुक्यात 230, शिरपूर तालुक्यात 163, तर शिंदखेडा तालुक्यात 141 आरोग्य पथके कार्यरत आहेत.

या पथकांनी धुळे तालुक्यातील 3 लाख 67 हजार 816, साक्री तालुक्यात 4 लाख 56 हजार 843, शिरपूर तालुक्यात 3 लाख 37 हजार 872, शिंदखेडा तालुक्यातील 2 लाख 39 हजार 444 नागरिकांची 29 सप्टेंबर 2020 अखेर आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत धुळे जिल्ह्यातील 92 टक्के नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेत आतापर्यंत रक्तदाबाचे 8 हजार 417, कर्करोगाचे 322, मधुमेहाचे सात हजार 562, खोकला 1 हजार 223, तापाचे एक हजार 293, श्वास घेण्यास त्रासाचे 76, घसा दुखीचे 46 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय इतर आजारांचे चार हजार 375 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 713 रुग्णांना पुढील औषधोपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.

आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 घरांना भेट देत आहेत. पथकातील सदस्य संबंधित घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेत आहेत.

ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणार्‍या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येत आहे. तेथे कोविड 19 ची प्रयोगशाळा चाचणी करून पुढील उपचार केले जात आहेत.

कोमॉर्बिड असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात किंवा नाही याची खात्री आरोग्य पथकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. माझे कुटुंब- माझी जबाबदारी ही मोहीम 25 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.

यात पहिली फेरी 10 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. दुसरी 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत होईल. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असून दुसर्‍या फेरीचा कालावधी 10 दिवसांचा आहे. या मोहिमेच्या यशस्वितेसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., आयुक्त अजिज शेख यांचे सहकार्य लाभत आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवचंद्र सांगळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मोरे आरोग्य पथकांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या