Friday, April 26, 2024
Homeनगरराहुरीत गटार स्वच्छतेच्या मोहिमेतील सफाई कर्मचार्‍यांची आरोग्य सुरक्षा ‘रामभरोसे’

राहुरीत गटार स्वच्छतेच्या मोहिमेतील सफाई कर्मचार्‍यांची आरोग्य सुरक्षा ‘रामभरोसे’

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

करोना महामारीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जीवाला जपत आहे. मात्र, राहुरी नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे सफाई कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यांची दखल कोण घेणार? असाच प्रश्न प्रशासनाला नागरिकांनी विचारला आहे. स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने या कर्मचार्‍यांकडे दुर्लक्ष केल्याने या कर्मचार्‍यांची आरोग्य सुरक्षा रामभरोसे बनली आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपासून राहुरी शहरहद्दीतील नवीपेठ परिसरात भूमिगत गटारीच्या साफ सफाईचे काम चालू आहे. त्यासाठी खासगी लोकांकडून रोजंदारीवर काम करून घेतले जात आहे. साफ सफाईचे टेंडर घेतलेल्या ठेकेदाराने सफाई कामगारांना आवश्यक साहित्य पुरविणे गरजेचे आहे. मात्र, ठेकेदार जास्त फायदा करून घेण्यासाठी कामगारांना कोणतेही साहित्य पुरवित नाहीत. जोखीम पत्करून कामगार गटारीत उतरून हाताने गटारीतील घाण काढत आहेत. त्यांना बूट, हातमोजे, मास्क असे कोणत्याही प्रकारचे साहित्य मिळत नाही. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे मोल मजुरी करणार्‍या लोकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत मिळेल ते काम करतात. याचाच गैरफायदा घेऊन काही ठेकेदार या कामगारांच्या जिविताशी खेळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

करोना महामारीच्या काळात शासन हात स्वच्छ धुवा, मास्क लावा, असे कळकळीने सांगत आहे. राहुरी नगरपरिषदचे काम घेणारे ठेकेदार या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कामगारांचा जीव धोक्यात घालत आहेत. सध्या साथीच्या आजाराने जगात थैमान घातले आहे. अशावेळी काम करत असताना जर एखाद्या कामगाराच्या जिवावर बेतले तर याला राहुरी नगरपरिषद प्रशासन किंवा संबंधित ठेकेदार यापैकी कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. पालिका प्रशासनाने ठेकेदारांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. मात्र, टक्केवारीच्या ठेकेदारीमध्ये तेरी भी चूप मेरी भी चूप असाच प्रकार राहुरी नगरपरिषद प्रशासनाकडून सुरू असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या