Friday, April 26, 2024
Homeनगरविस्थापितांच्या भावनांशी खेळू नका - वहाडणे

विस्थापितांच्या भावनांशी खेळू नका – वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

टपरी माफियांची दहशत कायमस्वरूपी बंद करायची असेल तर नगरपरिषदेने हॉकर्स झोन उपलब्ध करून घ्यावेत. नगरपरिषद प्रशासक, पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांनी तसे नियोजन करावे. 12 वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्यांची झालेली फरफट लक्षात घेऊन कुणीही विस्थापितांच्या भावनांशी खेळू नये, अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात व्यक्त केली.

- Advertisement -

वहाडणे म्हणाले, 12 वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्यांना न्याय मिळावा यासाठी मी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांना अनेकदा भेटलो, प्रस्ताव दिले. पण दुर्दैवाने आपण सुचविलेल्या जागांवर गाळे-खोका शॉप उभारायला परवानगी मिळाली नाही. विस्थापितांच्या प्रश्नाचे अनेकांनी राजकारण केले, निवडणुका लढविल्या राज्यात सर्व पक्ष सत्तेवर येऊन गेले, पण प्रश्न सुटलेला नाही. ज्या जागांवरील अतिक्रमणे त्यावेळी हलविली त्या जागा मात्र काही टपरी माफियांनी बळकावून भाड्याने दिल्या.

त्या जागांवर व्यवसाय करणारे हातगाडीवाले, फेरीवाले, फळ विक्रेते, अंडा भुर्जीवाले यांच्याकडून हप्ते वसुल करणारे तथाकथित नेते-कार्यकर्ते कोण? रहदारीच्या समस्यांमुळे व शहरात वारंवार होत असलेल्या प्रचंड कोंडीमुळे पुन्हा एकदा अतिक्रमणे हलविली जात आहेत. काही काळानंतर पुन्हा काही माफिया पुढारी याच जागा बळकावतील व अनधिकृतपणे हप्ते वसुली करतील. नगरपरिषद अधिकार्‍यांवर दहशत करतील. मात्र हातावर पोट भरणारे बिचारे छोटे व्यावसायिक हप्ते वसुलीबद्दल बोलू शकत नाहीत.पुन्हा असे होऊ नये यासाठी खर्‍या गरीब व्यावसायिकांसाठी हॉकर्स झोन उभारणे गरजेचे आहे.

यानंतर पुन्हा याही विस्थापितांच्या प्रश्नाचे कुणीही राजकारण करू नये यासाठी प्रशासक शांताराम गोसावी यांना मी आवाहन करतो की, खर्‍या गरीब व्यावसायिकांची यादी करून त्यांना पुन्हा उठविले जाणार नाही अशा योग्य ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करावा.

शहरातील सर्व कर दात्यांनाही रस्त्याने वावरता आले पाहिजे. गर्दीत महिलांना व्यवस्थित जा-ये करता आली पाहिजे. 2-3 जागांवर पार्किंग व्यवस्था करून शहरातील रहदारी सुरळीत झाली तर सर्व व्यवसाय चांगल्या पद्धतीने होतील. भंगारचा व्यवसाय करणारे, मटण विक्रेते यांची सोय करण्यात आली, तशीच व्यवस्था इतरही व्यवसायिकांची करण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्यांचे स्वतःचे गाळे आहेत, गाळे भाडोत्री दिलेले आहेत त्यांना विस्थापित समजू नये. छोट्या व्यावसायिकांना तर हटविले, पण कुठल्याही परिस्थितीत बड्यांचे अतिक्रमणे काढलीच गेली पाहिजेत. तसे होणार नसेल तर मला रस्त्यावर यावे लागेल. सिन्नर-संगमनेर बस स्थानकाप्रमाणे कोपरगावच्या बस स्थानकाभोवतीही किमान 200 गाळे होऊ शकतात. तशी मागणीही मी परिवहन मंत्र्यांकडे केलेली आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी प्रयत्न केल्यास तेही गाळे होऊ शकतात.स्वतः अतिक्रमणे करून पुन्हा नेतेगिरी करणारेच अतिक्रमण हटाव मोहिमेस कारणीभूत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या