आमच्या रोजगाराचा व पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अतिक्रमण हटविण्यासाठी व्यापार्‍यांनी उपोषण केले. महापालिकेकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर ते उपोषण मागे घेण्यात आले. तर दुसरीकडे हॉकर्सना वार्‍यावर न सोडता त्यांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या सदस्यांनी आपल्या मुलाबाळांसह बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला होता. अतिक्रमणाच्या नावाखाली, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता, पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करावी, कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली परिसरातील हॉकर्सना वार्‍यावर न सोडता त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या सदस्यांनी केली. लहान मुले हातात तिरंगा ध्वज घेऊन रणरणत्या उन्हात आंदोलनात सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना निवेदन दिल्यानंतर हॉकर्स बांधवांनी मोर्चा महापालिकेकडे वळवला. महापालिकेच्या प्रवेशद्वारात ठिय्या देऊन जोरदार निदर्शने करण्यात आली. रोजगार आमच्या हक्काचा…, इनक्लाब जिंदाबाद…, न्याय मिळण्याच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता. या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साहेबान जहागीरदार, राजू खाडे, रमेश ठाकूर, नंदकुमार रासने, नवेद शेख, अनिल ढेरेकर, संतोष रासने, फिरोज पठाण, नितीन नाळके, कल्पना शिंदे, गफ्फार शेख आदींसह हॉकर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महापालिकेने एका रात्रीतून हॉकर्सवर हल्ला करून त्यांचा रोजगार हिरावला. हॉकर्स पाकिस्तान, बांग्लादेशातून आले नसून, ते भारतीय नागरिक आहेत. मागील 30 ते 40 वर्षांपासून पिढ्यान्पिढ्या ते विविध वस्तूंची विक्रीकरिता बाजारात स्टॉल लावतात. या हॉकर्सना मागील 15 दिवसांपासून स्टॉल लावण्यापासून रोखण्यात आल्याने त्यांची रोजी-रोटी हिरावून त्यांच्या पोटावर पाय देण्यात आला असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला. दोन वर्षांपासून करोनामुळे रमजान ईद साजरी करता आलेली नाही. लवकरच पवित्र रमजान महिना सुरू होत असून, हा वाद न वाढविता पर्याय शोधावा. हॉकर्सना जात-धर्म नसून, पोटासाठी रोजी-रोटी हा एकच त्यांचा धर्म असून, यामध्ये जातीय राजकारण न आणता सर्व हॉकर्सची पर्यायी व्यवस्था करून देण्याचे साहेबान जहागीरदार यांनी सांगितले.

व्यापारी, राजकीय पक्ष व काही संघटनांनी विरोध केल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तातडीने कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली परिसरातील हॉकर्सना स्टॉल लावण्यास मज्जाव केला आहे. महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने दबावाखाली एकतर्फी कारवाई केलेली आहे. हॉकर्सचा कोणताही विचार न करता त्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम करण्यात आले असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

आज मनपात बैठक

कापड बाजारपेठ परिसरातील हॉकर्सच्या रोजगाराचा व पुनर्वसनाचा मार्ग निघत नाही, तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा संघटनेने घेतला होता. मात्र आयुक्त उपस्थित नसल्याने हॉकर्स संघटनेची बैठक आज, गुरूवारी सकाळी 11 वाजता घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आजच्या बैठकित हॉकर्सच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *