Thursday, April 25, 2024
Homeनगरहरेगावच्या बेलापूर इंडस्ट्रीजकडील जमिनीचा ताबा सोडा

हरेगावच्या बेलापूर इंडस्ट्रीजकडील जमिनीचा ताबा सोडा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील बेलापूर इंडस्ट्रीज लि. या कंपनीकडे शेती महामंडळाची असलेली 694 एकर जमीन भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने सरकारकडे वर्ग करण्यात आली आहे. या जमिनीच्या सात-बारा उतार्‍यावर इतर हक्कात असलेली भाडेपट्ट्याची नोंद रद्द करून संबंधितांना जमिनीचा ताबा सोडण्याची नोटीस महसूल विभागाकडून बजावण्यात आली आहे. माजी मंत्री स्व. गोविंदराव आदिक यांच्या कुटुंबियांकडे या कारखान्याची मालकी आहे. दरम्यान या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यासाठी संबंधितांनी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव दाखल केला आहे.

- Advertisement -

सन 1920 मध्ये शेती महामंडळाची सुमारे 735 एकर जमीन 99 वर्षांच्या भाडेपट्ट्याने बेलापूर इंडस्ट्रीज लि.कंपनीला देण्यात आली होती. नंतरच्या काळात सरकारातील बदलामुळे शासन निर्णयातही बदल झाले. त्यावेळी सरकारने जेथे जेथे कराराने जमिनी दिल्या होत्या त्या काढून घेतल्या. त्यात या कंपनीचीही काही जमीन शेतीमहामंडळाकडे वर्ग झाली होती. त्यानंतरही कंपनीकडे शेती महामंडळाचे 277.60 हे. आर. म्हणजेच 694 एकर क्षेत्र होते. सन 2019 मध्ये कंपनीने केलेल्या भाडेपट्ट्याची मुदत संपली होती. त्यानंतर कंपनीच्यावतीने भाडेपट्ट्याची मुदत वाढवून मिळण्यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी देण्यात आला होता. परंतु त्यावेळी त्यास मंजुरी मिळाली नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रसच्या गेल्यावेळच्या आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असताना त्यांच्यामार्फत सरकारकडे 30 वर्षांची मुदतवाढ मिळण्यासाठीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु या जमिनीच्या महसुलापोटी कंपनीकडे असलेली थकीत रक्कम प्राधान्याने भरावी, असे सुचविण्यात आले होते. ही रक्कम न भरल्याने मुदतवाढीच्या प्रस्तावावर निर्णय झाला नाही. त्यानंतर महायुतीचे व आता पुन्हा महाआघाडीचे सरकार आले. शासनाकडून सदरची जमीन ताब्यात घेण्याच्या हालचाली झाल्या. या जमिनीवर सरकारचे नाव लावावे, असे आदेश शासनाकडून देण्यात आले. त्यानुसार नुकतीच आदेशाची कार्यवाही झाली आहे.

शासन आदेशानुसार बेलापूर इंडस्ट्रीज लि. या कंपनीच्या सी ब्लॉक पैकी 214.73 हे.आर. व बी ब्लॉक पैकी 62.87 हे. आर. अशा एकूण 694 एकर भाडेपट्ट्याने दिलेल्या क्षेत्राची मुदत संपल्याने या क्षेत्रावर मुलकी पडीत असलेले नाव कमी करून महाराष्ट्र शासनाचे नाव लावण्यात आले आहे. तसेच कंपनीचे नावाने अधिकार अभिलेखामध्ये पीक पाहणी अथवा इतर अधिकारामध्ये असलेली नावे कमी करण्यात आली आहेत.

या जमिनीची सी ब्लॉक व बी ब्लॉक म्हणून नोंद असून बेलापूर इंडस्ट्रीज लि. कंपनीला ती 99 वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिलेली होती. तिची मुदत संपल्याने इतर हक्कातून भाडेपट्ट्यांची नोंद कमी केली आहे. ही कार्यवाही झाल्यानंतर संबंधितांना जमिनीचा ताबा सोडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. आम्ही नूतनीकरणासाठी प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला असून ते पेंडींग आहे, असा संबंधितांचा दावा आहे.

– श्री. प्रशांत पाटील, तहसीलदार, श्रीरामपूर.

- Advertisment -

ताज्या बातम्या