Wednesday, April 24, 2024
Homeअग्रलेखउद्याचा वर्षारंभ आनंदित!

उद्याचा वर्षारंभ आनंदित!

राज्यसरकारने आजपासून करोनामुळे घातले गेलेले निर्बंध काढून टाकले आहेत. हा निर्णय कदाचित लोकभावनांचा आदर करण्यासाठीच घेतला गेला असावा. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा निर्णय जाहीर झाल्याने जनताही आनंदली आहे. गेली दोन वर्षे करोनाने माणसांच्या जगण्याची सगळी परिमाणेच बदलून टाकली. करोनाचा विषाणू जगासाठीच नवा होता. त्यामुळे सरकारनेही परिस्थितीनुसार निर्णय घेतले. साथीच्या सुरुवातीच्या काळात माणसे घरात बंदिस्त केली गेली. सक्तीची टाळेबंदी लागू केली गेली. करोनाचा विषाणू तीव्र संसर्गजन्य असल्याचे शास्त्रज्ञांनी जाहीर केले. त्यामुळे सोशल डिस्टंसिन्ग, तोंडाला मुसके बांधणे आणि वारंवार हात धुणे हि त्रिसूत्री पाळणे बंधनकारक केले गेले. सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने होती. परिणामी विवाहसोहळे देखील पाच-पंचवीस पाहुण्यांमध्ये उरकावे लागले. अनेकांची जवळची माणसे करोनाने दगावली. अनेकांच्या आप्तेष्टांचा नैसर्गिक मृत्यू झाला. करोनासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे त्यांचे अखेरचे दर्शन देखील घेणे त्यांच्या नातेवाईकांना शक्य झाले नाही. करोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांवर तर परस्र्पर अंत्यसंस्कार करावे लागण्याची दुर्दैवी वेळ काहींवर आली. त्यावेळची परिस्थितीच तशी होती. यंत्रणेनेही अनेकदा घोळ घातले. निर्बंधांची त्रिसुत्री, सक्तीची टाळेबंदी, सामाजिक कार्यक्रम आणि विवाहसोहळ्यांना उपस्थितीवर मर्यादा, करमणुकीच्या साधनांना स्थगिती अशा अनेक मुद्यांवर यंत्रणेची अवस्था कायमच दोलायमान राहिली. निर्बंध जाहीर करणे, ते मागे घेणे सातत्याने घडल्याचा अनुभव लोकांनी घेतला. शाळाही जवळपास दीड-दोन वर्षे बंद होत्या. त्याचेही विपरीत परिणाम हळूहळू निदर्शनास येत आहेत. पुढेही कदाचित येत राहातील. करोनामुळे “न्यू नॉर्मल्स’ ची लोकांना सवय करून घ्यावी लागली. हे न्यू नॉर्मल्स कदाचित कायम राहातील अशाही चर्चा झडत होत्या. बाकीचे निर्बंध टप्याटप्याने शिथिल होत गेले. पण तोंडाला मुसके बांधावेच लागेल असेही सांगितले गेले. पण अंतिमतः आता सगळेच निर्बंध राज्य सरकारने उठवले आहेत. लोक आता मोकळा श्वास घेतील. आगामी काळातील सणसमारंभ जोरात साजरे करू शकतील. विवाहसोहळे दणक्यात आयोजित केले जातील. पर्यटन नव्या उत्साहात सुरु होईल. आर्थिक घडी बसायला त्याची नक्कीच मदत होईल. तथापि करोना अजूनही समूळ नष्ट झालेला नाही याचा विसर पडू नये. तो अजून कोणत्या ना कोणत्या देशात धुमाकूळ घालतोच आहे. नाशिकमध्येही काल काही रुग्ण आढळले. जागतिक आरोग्य संघटनेनेही काही इशारे दिले आहेत. करोनाच्या नवनव्या अवतारांकडे गांभीर्याने पाहावे असे म्हंटले आहे. राज्य करोनामुक्त करताना राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी देखील लोकांना यासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी निर्बंधमुक्तीचा जरूर आनंद घ्यावा. पण सुरक्षितता म्हणून तोंडाला मुसके बांधावे असे त्यांनीही म्हंटले आहे. करोनाने लोकांनाही बरेच काही शिकवले आहे. त्यामुळे तेही राज्याच्या कारभाऱ्यांच्या आवाहनातील मथितार्थ लक्षात घेतील. करोना काळातील आदेशांच्या भरमसाठ मार्‍यामुळे अनेकदा जनतेचा मनातील गोंधळ वाढत होता. महाप्रचंड सरकारी यंत्रणेच्या कामकाज पद्धतीतील काही उणीवांवर देखील त्यामुळे उजेड पडला. त्या उणीवा दूर करण्याच्या दृष्टीने आता पावले उचलली जातील अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या