Thursday, April 25, 2024
HomeराजकीयHappy Birthday Dr. Manmohan Singh : जगातील सर्वात उच्चशिक्षित पंतप्रधान

Happy Birthday Dr. Manmohan Singh : जगातील सर्वात उच्चशिक्षित पंतप्रधान

भारताचे १४ वे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस. जगातील सर्वात उच्चशिक्षित पंतप्रधान तसेच भारताच्या अर्थकारणाला ऐतिहासिक कलाटणी देणारे पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ. सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे.

- Advertisement -

1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली . त्यानंतर 1962 साली डॉ. सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली. त्यांचे ‘इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स अन्ड प्रोस्पेक्ट्स फोर सेल्फ ससटेन्ड ग्रोथ’ ( India’s Export Trends and Prospects for Self-Sustained Growth ’) हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे.

पंजाब विद्यापीठ व प्रथितयश दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्स मध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना डॉ सिंग यांची शैक्षणिक ओळख अधिक समृद्ध झाली. या काळात युएनसीटीएडी सचिवालयात त्यांनी काही काळ काम पहिले होते. त्यातूनच त्यांची 1987 आणि 1990 या काळात जीनिव्हा येथील साउथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली.

डॉ. सिंग यांनी 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली व त्यांचा सरकारमध्ये प्रवेश झाला. त्यातूनच 1972 साली त्यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. डॉ. सिंग यांनी अर्थमंत्रालयात भूषविलेल्या अनेक महत्वाच्या पदांमध्ये अर्थ मंत्रालयाचे सचिवपद , नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद,पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद आदी पदांचा समावेश होतो.

स्वतंत्र भारतच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्‍या 1991-1996 या पाच वर्षांच्या काळात डॉ. सिंग यांनी भारताचे अर्थ मंत्रिपद भूषविले. भारताच्या आर्थिक सुधारणा अमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात सिंग यांची भूमिका जगभरात नावाजली जाते. हा काळ डॉ. सिंग यांच्या नावाशी घट्ट जोडला गेला आहे.

त्यांच्या कारकीर्दीत त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अनेक महत्वाच्या पुरस्कारांपैकी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार(1987), भारतीय विज्ञान कॉंग्रेस मध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्म शताब्दी सन्मान(1995), अर्थ मंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड (1993 व 1994), केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार (1956), केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार आहेत.

जपान निहोन कायझाई शिम्बून सारख्या अनेक संस्थांनी डॉ. सिंग यांना सन्मानित केले आहे. केम्ब्रिज व ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांकडूनही डॉ सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे . डॉ. सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी 1993 मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.

डॉ. सिंग यांनी 1991 पासून राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात खासदारपद भूषविले आहे 1998-2004 च्या दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेत्याची भूमिकाही पार पडली आहे. 22 मे 2004 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली व 22 मे 2009 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या