Thursday, May 2, 2024
Homeनाशिकहँडग्लोज, मास्कअभावी सेवकांचे आरोग्य धोक्यात

हँडग्लोज, मास्कअभावी सेवकांचे आरोग्य धोक्यात

मनमाड । बब्बू शेख Manmad

साधे हँडग्लोज (Handgloves) आणि मास्कसारख्या (mask) आवश्यक असलेल्या वस्तु देखील दिल्या जात नसल्यामुळे हातात प्लास्टिकची पिशवी (Plastic bag) घालून घाण उचलण्याची वेळ मनमाड नगर परिषदेतील (Manmad Municipal Council) महिला आणि पुरुष सफाई कामगारांवर (Sweepers) आली आहे. मात्र त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी (Health care) घेणार्‍या सेवकांचेच आरोग्य धोक्यात आले आहे.

- Advertisement -

स्वच्छता सेवकांच्या या हालअपेष्टांना पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा नव्हे तर नाकर्तेपणा जबाबदार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. पालिका प्रशासनातर्फे नागरिकांना पाहिजे तेवढ्या मुलभूत सुविधा (Infrastructure) तर दिल्या जात नाही आता त्या पाठोपाठ आता सफाई कामगारांना देखील वार्‍यावर सोडण्यात आले कि काय? असा प्रश्न नागरीकांतर्फे उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, सफाई कामगारांना तातडीने आवश्यक असलेल्या वस्तू देण्यात याव्यात अशी मागणी आरपीआयचे (RPI) गुरुकुमार निकाळे यांनी केली आहे. या मागणीची पुर्तता न झाल्यास आरपीआयतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्ह्यात मालेगावनंतर (malegaon) मनमाड (manmad) एकमेव मोठे शहर आहे. गेल्या काही वर्षात या शहराचा झपाट्याने विस्तार होत असून अनेक नवीन वस्त्या देखील निर्माण झाल्या आहे.

शहराची लोकसंख्या सव्वा लाखांपर्यंत गेली असून नगर परिषदेत सुमारे 240 पेक्षा जास्त सफाई कामगार सेवा देत असून त्यात महिलांचा देखील समावेश आहे. उन्हाळा, पावसाळा असो किंवा हिवाळा वर्षाच्या बारमाही सफाई कामगारांना पहाटे कामावर यावे लागते, उजेड होण्या अगोदर सफाई कामगार शहराला स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.

सफाई कामगारांना घाणीत काम करावे लागत असल्यामुळे त्यांना रोगराई होण्याची जास्त शक्यता असते त्यापासून बचाव व्हावा या करिता त्यांना पायात घालण्यासाठी गमबूट, हातात घालण्यासाठी हँडग्लोज आणि तोंडाला लावण्यासाठी मास्क आदी चांगल्या दर्जाच्या वस्तू देणे बंधनकारक आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून अशा वस्तू कधीच वेळेवर दिल्या जात नाही ज्या दिल्या जातात त्या इतक्या नित्कृष्ट दर्जाच्या असतात कि काही दिवसात त्या खराब होतात.

त्यामुळे पायात चप्पल, हातात प्लास्टिकची पिशवी घालून काम करण्याची वेळ या सफाई कामगारांवर आली आहे. शहराची स्वच्छता करतांना स्वत:च्या स्वच्छतेची काळजी घेता येत नसल्याने या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे कामगार संघटना पालिकेत आहे मात्र सफाई कामगारांवर अन्याय केला जात असतांना देखील या संघटना आवाज का उठवत नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

स्वच्छता सेवक शहरातील नागरीकांचे आरोग्य चांगले राहावे यास्तव स्वत:च्या आरोग्याची चिंता न करता घाणकचरा उचलत आहेत. त्यामुळे पालिकेने मानवतेच्या दृष्टीकोनातून या सेवकांना आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू तात्काळ पुरवाव्यात, अशी अपेक्षा नागरीकांतर्फे व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या