Wednesday, April 24, 2024
Homeनगरएलसीबीची हातभट्टीवर छापेमारी; तीन लाखांचा साठा नष्ट

एलसीबीची हातभट्टीवर छापेमारी; तीन लाखांचा साठा नष्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून सहा जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत दोन लाख 88 हजार 200 रूपयांचे हातभट्टीचे साधने, चार हजार 700 लीटर कच्चे रसायन, 532 लीटर तयार दारू जप्त करून नष्ट केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संतोष गोवर्धन पवार, गोकुळ ऊर्फ पप्पु अनिल पवार (दोघे रा. ब्रम्हतळे, भिंगार) व एक महिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत खातगाव टाकळी व निंबळक येथे हातभट्टीवर कारवाई करण्यात आली. खातगाव टाकळी येथील किशोर विलास पवार, दिलीप माधव पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निंबळक येथील राहुल भाऊसाहेब गव्हाणे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार भाऊसाहेब काळे, बबन मखरे, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, आकाश काळे, अंबादास पालवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मटक्यावर कारवाई

तपोवन रोडवरील दोस्ती हॉटेलच्या पाठीमागे टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या कल्याण मटक्यावर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. लोकांकडून पैसे घेवून कल्याण मटका जुगार खेळताना व खेळविताना नितेश राजाराम धोत्रे (वय 26) याला पकडले. पोलीस अंमलदार सतिष त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून धोत्रे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपअधिक्षकांच्या पथकाने दारू पकडली

नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी स्वतंत्र पथक स्थापन करून कारवाई सुरू केली आहे. त्यांनी सोमवारी दुपारी सावेडी उपनगरातील यशोदानगर बाजारतळावर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणार्‍या विशाल अरूण शिंदे (वय 31 रा. पाईपलाईन रोड) याला पकडले. त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई नागरदेवळे येथे केली. भिंतीच्या आडोशाला दारू विक्री करणारा सुनील गेणुदास वाघचौरे (वय 56) याला पकडून त्याच्याकडून सहा हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाघचौरे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या