Thursday, April 25, 2024
Homeनगरसभागृह, मंगल कार्यालये व लॉन्स सुरू करण्यास परवानगी

सभागृह, मंगल कार्यालये व लॉन्स सुरू करण्यास परवानगी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बंदिस्त सभागृहे व मोकळ्या जागेतील कार्यक्रमांनाही परवानगी द्यावी,

- Advertisement -

यासाठी महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. राज्य सरकारने नाट्यगृहे व चित्रपटगृहांना ज्या निकषांच्या आधारावर सुरू करण्यास परवानगी दिली आहे, त्याच तत्त्वानुसार बंदिस्त सभागृहे आणि लॉन्स चालकांनाही दिलासा देण्यात आला असून मंगल कार्यालये व लॉन्स चालकांनी नियमांच्या अधीन राहून ती सुरू करावीत, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष गोरख कुटे, कार्याध्यक्ष भगवान फुलसौंदर, सचिव रोहिदास धुमाळ यांनी केले आहे.

राज्यात हजारो मंगल कार्यालये आणि लॉन्स आहेत. त्याठिकाणी होणार्‍या लग्न समारंभासाठी लागणार्‍या विविध सुविधा पुरविणार्‍या जवळपास 30 घटकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या मार्चपासून राज्यातील सर्व बंदिस्त मंगल कार्यालये व लॉन्स बंद असल्याने यासर्वांवर उपासमारीची वेळ आली होती.

महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनने त्यासाठी पुढाकार घेत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंत्री थोरात यांनी असोसिएशनचे पदाधिकारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घालून दिली व गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या या सभागृहांना आणि लॉन्सला सुरु करण्यासाठी राज्य सरकारची सशर्त परवानगी मिळविली.

याबाबत राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या असून त्याच्या अधीन राहून मंगल कार्यालये व लॉन्स सुरु करण्यास नियंत्रित स्वरुपात परवानगी दिली आहे. राज्यातील बंदिस्त सभागृहे व मोकळ्या (लॉन्स) जागांमध्ये होणार्‍या कार्यक्रमांचे परिचालन करताना कोविड 19 बाबत केंद्र व राज्य सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करण्यासोबतच निर्बंध असलेल्या गोष्टींचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

सभागृहात अथवा लॉन्समध्ये होणार्‍या कार्यक्रमांना सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करुन क्षमतेच्या पन्नास टक्के लोकांनाच प्रवेश द्यावा, प्रत्येकाची थर्मल चाचणी (तापमापी) केल्यानंतरच त्यांना आत सोडावे, सभागृह, त्यातील खोल्या, प्रसाधनगृह यांचे वेळोवेळी निर्जतुंकीकरण करावे, सभागृहात उपस्थितीत असणार्या सर्वांच्या तोंडावर मास्क असणे अनिवार्य असावे, सभागृहातील साधन-सामुग्री हाताळण्याची जबाबदारी एकानेच सांभाळावी, सभागृहात प्रवेश देताना गर्दी होणार याबाबत अधिक दक्षता घ्यावी, त्यासाठी सुरक्षित अंतराच्या मानकांप्रमाणे प्रवेशद्वार व सभागृहातील बैठक व्यवस्था येथे जमिनीवर रेखांकन (खुणा) कराव्यात. वातानुकूलीत व्यवस्था असणार्‍या सभागृहातील तापमान 24 ते 30 अंशादरम्यानच ठेवावे.

सभागृहाशिवाय मोकळ्या जागी व लॉन्समधील कार्यक्रमांसाठी प्रत्येकी 6-6 फुटांवर बसण्याच्या अथवा उभे राहण्याच्या खुणा असाव्यात. या दोन्ही ठिकाणी खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर गर्दी होणार नाही यासाठी जास्तीत जास्त स्टॉल्स उभारावेत, स्टॉल्सवर वाढप्याची भूमिका बजावणार्‍या व्यक्तीने मुखपट्टीसह हाता ग्लोज घालावेत. अशा कार्यक्रमातून शक्य असल्यास माझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमाची ध्वनीफित सुरू ठेवून कोविडबाबत जनजागृती करावी. यासह केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या व यापुढेही देण्यात येणार्‍या सूचनांचे पालन करण्याबाबत सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या