Saturday, April 27, 2024
Homeनगरसंगमनेर तालुक्यात बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची आयात

संगमनेर तालुक्यात बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची आयात

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

राज्यात गुटखा विक्री आणि उत्पादनाला बंदी असतानाही संगमनेर शहर व तालुक्यात खुलेआम मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री केली जात आहे. बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर संगमनेरात गुटख्याची आयात केली जात आहे. या व्यवसायात एक बिगर मिशीवाला आणि दाढीवाला या वर्णनाने परिचित असलेल्या दोघांची प्रमुख भूमिका असल्याचे दिसत आहे. तालुक्यात या दोघांकडूनच सध्या गुटख्याचा पुरवठा केला जात असताना संबंधित खात्याचे मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रामध्ये गेले काही वर्षांपासून गुटखा विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे. संगमनेर तालुक्यात मात्र या बंदी आदेशाला गुटखा विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवली आहे. संगमनेरात दररोज लाखो रुपयांच्या गुटख्याची विक्री करण्यात येत आहे. शहरातील अनेक पान टपर्‍यामध्ये गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. अन्न भेसळ खाते व पोलीस प्रशासनाचे या बेकायदेशीर व्यवसायाकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे.

संगमनेर तालुक्यात पूर्वी तालुक्यातील एक जण या व्यवसायात अग्रभागी होता. या गुटखाकिंगचा प्रभाव कमी झाल्याने इतर गुटखा विक्रेत्यांचा उदय झाला. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील निमगावजाळी परिसरातील एक जण गुटखा किंग म्हणून पुढे आला होता. तालुक्यातील अनेक विक्रेत्यांना तो मोठ्या प्रमाणावर गुटखा पुरवठा करायचा. मात्र त्याचे या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्याने शहरातील दोन व्यक्तींनी गुटखा व्यवसायावर ताबा घेतल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील घुलेवाडी परिसरातील एक व उपनगरातील एक जण असे दोघेजण गुटख्याचा व्यवसाय करताना दिसत आहे. त्यातील एक जण बिगर मिशीवाला व एक जण दाढीवाला या वर्णनाने परिचित आहे. निमगावजाळी परिसरातील गुटखा विक्रेत्याने गुटखा पुरवठा बंद केल्याने याचा चांगला गैरफायदा या दोघांनी घेतलेला आहे. चढ्या दराने ते गुटखा विक्री करताना दिसत आहे. तब्बल दीडपट भावाने ते गुटखा विक्री करत आहे.

पुणे जिल्ह्यातील एका गावातून संगमनेरला हा गुटखा पुरवठा केला जात आहे. संगमनेर तालुक्यात सर्रासपणे बेकायदेशीर गुटखा विक्री होत असताना संबंधित खात्यांचे मात्र या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. संगमनेरातील गुटखा विक्रेते याचा मोठ्या प्रमाणावर गैरफायदा घेऊन लाखो रुपयांची कमाई करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या