Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगBlog : गुरुपौर्णिमा : आदरांजलीचा अनोखा दिवस

Blog : गुरुपौर्णिमा : आदरांजलीचा अनोखा दिवस

भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेमध्ये अनेक अद्वितीय पैलू आहेत. ज्यातून आपल्या परंपरेचा पाया किती सखोल विचारांवर प्रस्थापित आहे ते स्पष्टपणे दिसून येते. आपल्या पारंपरिक मूल्यांचा महत्त्वपूर्ण भाग असणारा आपल्या जीवनाचा एक पैलू म्हणजे गुरु शिष्य संबंध. भारतीय समाजाने अनादी काळापासून गुरूला सर्वोच्च स्थान दिले आहे, कारण गुरूची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही….

संत कबीरांनी म्हटल्याप्रमाणे, कहैं कबीर बल बल सतगुरु की । धन्न शिष्य का लहना ॥ म्हणजे गुरूची महती शब्दांच्या पलीकडची असते आणि शिष्याचे भाग्य मोठे असते. श्री.श्री. परमहंस योगानंद यांच्या शिष्या आणि योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस)/सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिप (एसआरएफ) च्या माजी अध्यक्षा श्री मृणालिनी माता, यांनी त्यांच्या गुरु-शिष्य संबंध (गुरु-डिसायपल रिलेशनशिप); या पुस्तकात, ‘गुरु जसे शिष्याचे जीवन बदलू शकतात, तसे अन्य कोणतीही शक्ती करू शकत नाही’, हे प्रभावीपणे समोर आणले.

- Advertisement -

शिष्याला हुबेहूब आपल्यासारखे घडवण्याची क्षमता आणि अंगभूत शक्ती गुरूकडे असते. योगानंदजींनी साधकांना गुरु निवडताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे, जेव्हा तुम्ही जीवनाच्या खाईत आंधळ्यासारखे चाचपडत असता, अंधारात अडखळत असता, तेव्हा तुम्हाला डोळस व्यक्तीची मदत आवश्यक असते.

एखादा मार्ग खरा आहे की नाही हे समजण्यासाठी, त्यामागे कोणत्या प्रकारचे गुरू आहेत, त्याच्या कृतींवरून ते ईश्वराने दाखवलेल्या मार्गावर चालत आहेत की स्वतःच्या अहंकारानुसार वागत आहेत; या गोष्टी तपासून पहा. त्याच्यामागे कितीही अनुयायी असले, तरी ज्याला आत्मानुभव नाही, तो मार्गदर्शक तुम्हाला ईश्वराचे साम्राज्य दाखवू शकत नाही.

हिमालयात शतकानुशतके वास्तव्य केलेले महान मृत्युंजय गुरू महावतार बाबाजी यांनी 1861 मध्ये आपल्या महान शिष्य लाहिरी महाशयांना क्रियायोगाच्या लुप्त पावलेल्या कलेची दीक्षा दिली होती. त्यानंतर लाहिरी महाशयांचे शिष्य स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांनी योगानंदजींना प्रशिक्षित करण्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली.

योगानंदजींनी स्थापन केलेल्या योगदा सत्संग सोसायटी/सेल्फ रिअलाइझेशन फेलोशिप या संस्थांद्वारे लाखो लोकांना या मुक्तीदायी वैज्ञानिक प्रविधीची दीक्षा देण्यात आली आणि आज सुमारे 175 देशांमध्ये त्याच्या पाउलखुणा दिसत आहेत.

योगानंदजींच्या जागतिक स्तरावर प्रशंसा प्राप्त झालेल्या, जीवनाला कलाटणी देणार्‍या, योगी कथामृत ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी या अभिजात आध्यात्मिक पुस्तकात, गुरू शिष्य नातेसंबंध अतिशय प्रेमाने आणि सविस्तरपणे वर्णन केले आहेत.

जगत गुरू; म्हणून ओळखले गेलेले योगानंदजी यांचा मुख्य भर महर्षी पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांगयोगाच्या मार्गाचे अनुसरण करून नियमित आध्यात्मिक साधनेद्वारे आंतरिक लढाई जिंकण्यावर आहे. खरे पाहता प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक आत्मा आहे आणि परमात्म्याशी स्वतःचे एकत्व पुन्हा शोधण्याची आंतरिक तळमळ प्रत्येकाला आहे, हे सत्य योगानंदजींनी लोकांच्या मनावर बिंबवले.

गुरुपौर्णिमा ही भारतातील महान गुरूंना आदरांजली वाहण्याची सर्वात मधुर प्रथा आहे. या महत्त्वपूर्ण दिवशी गुरूंच्या आदर्शांना पुनःसमर्पण करून, निष्ठावान शिष्य आत्म-साक्षात्काराच्या शिडीवर पुढची पायरी चढतो.

– विवेक अत्रे

- Advertisment -

ताज्या बातम्या