Thursday, April 25, 2024
Homeनगरगुरु शिष्याच्या निधनाने कार्यकर्ते अस्वस्थ

गुरु शिष्याच्या निधनाने कार्यकर्ते अस्वस्थ

करंजी |वार्ताहर| Karanji

शिवसेनेमध्ये निर्भीड आणि धाडसी शिवसैनिक म्हणून राजकारणात एंट्री केलेल्या, सलग 15 वर्षे तालुक्यातील मिरी, करंजी जिल्हा परिषद गटाचे सदस्य म्हणून काम करताना शिवसेनेची खरी ओळख तालुक्यात निर्माण करणारे दिवंगत मोहनराव पालवे व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेऊन राजकारणाला सुरुवात करत काही दिवसांतच तडफदार भाषण शैली, आक्रमक, बाणा या गुणवत्तेच्या जोरावर जिल्हा परिषद सदस्य, सेना उपजिल्हाप्रमुख या पदांवर काम केलेले याच गटातील नेते दिवंगत अनिल कराळे या दोन्ही नेत्यांचा सात महिन्यांच्या फरकाने झालेले निधन गटातील कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावणारे ठरले आहे. अशा या गुरू शिष्याच्या अकाली निधनाने मिरी, करंजी गटात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली असून त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. तर गटातील शिवसेनेचे दोन वाघ गेल्याची भावना त्यांच्या मनाला बोचत आहे.

- Advertisement -

गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना शिवसेना पक्षाचं नेहमीच आकर्षण राहिलेलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षाने नेहमीच सामान्यांना पदे देवून त्यांंनी त्यांना सामाजकारण आणि राजकारण करण्याची संधी दिलेली आहे. याचे उदाहरण म्हणजे दिवंगत मोहनराव पालवे. ते मुंबई येथे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. तेथेच स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मनात भिनले आणि काही दिवसांतच मुंबईवरून ते पुन्हा कोल्हार या गावी परतले. त्यानंतर त्यांनी तालुक्यात मोटारसायकलवरून शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. दरम्यान, तालुका प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि तिथून त्यांनी खर्‍याअर्थाने आल्या राजकारणाला सुरूवात केली. तालुक्यात गाव तिथे शाखा उभी केली. त्यानंतर मिरी झेडपी गटाचे तीन वेळा ते सदस्य म्हणून निवडून गेले.

त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याच नेतृत्वाखाली दिवंगत अनिल कराळे यांनी शिवसेना पक्षात संघटन आणि नंतर राजकीय मोर्चेबांधणी करत आपले स्वतंत्र राजकीय प्रस्थ निर्माण केले. तसेच तालुक्यातच नव्हे तर जिल्हा पातळीवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. हे दोन्ही नेते कौटुंबिकदृष्ट्या अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे आलेले होते. मात्र, मनाने फार मोठे होते. त्यांनी नेहमी सर्वसामान्य कुटुंबाला सोबत घेऊन त्यांच्या सुखदुःखात धावून जात सर्वसामान्यांशी असणारी नाळ कधीही तुटू दिली नाही. म्हणूनच ते राजकारणात शेवटपर्यंत यशस्वी होत गेले. या दोन्ही नेत्यांनी प्रस्थापित नेत्यांपुढे नेहमी राजकीय आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अनेक अडचणींना देखील सामोरे जाण्याची वेळ आली. परंतु सर्वसामान्य जनतेची त्यांच्या पाठीशी असणारी ताकद, आशीर्वाद त्यांना नेहमीच कामी आला.

मात्र, करोना महामारीमुळे सात महिन्यांपूर्वी या गटाचे विद्यमान सदस्य व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कराळे यांचे निधन झाले त्यांच्या दुःखातून शिवसैनिक त्यांचे हितचिंतक सावरत नाहीत, तोच चार दिवसांपूर्वी करोनामुळे त्यांचे राजकीय गुरू माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना नेते पालवे यांचे देखील निधन झाले. या दोन्ही नेत्यांच्या निधनामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता आणि या गटात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. दोघांच्या अकाली जाण्यामुळे गटातील कार्यकर्त्यांसोबतच सामान्यांचे हाल होणार आहेत. हात दाखवा गाडी थांबवा, मोबाईल सदस्य म्हणून या दोन्ही नेत्यांची या गटात ओळख होती. गटात फेरफटका मारताना अबाल वृध्दापासून कोणीही गाडीला हात दाखवला तर यांची गाडी क्षणात थांबणारच. समोरच्या व्यक्तीची आपुलकीने विचारपूस करणार, त्याचे प्रश्न जाणून घेणार व त्याच ठिकाणी त्याच्या प्रश्नांची सोडवणूक करणार आणि त्यानंतर पुढे निघून जाणे अशी ओळख दोघांची होती.

राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघातील विशेषतः पाथर्डी तालुक्यातील 39 गावांतील प्रमुख नेते म्हणून ज्यांची ओळख होती व ज्यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी खूप मोलाची कामगिरी केली असे जिल्हा परिषद सदस्य अनिलराव कराळे व माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या निधनामुळे तालुक्यासोबत माझेही राजकीय नुकसान झाल्याची भावना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या