Wednesday, April 24, 2024
Homeजळगावगुरु(जी) कुठे आहात तुम्ही...?

गुरु(जी) कुठे आहात तुम्ही…?

आदरणीय गुरुजी…

सा.न.वि.वि.

- Advertisement -

आज गुरुपौर्णिमा. म्हटलं तुम्हाला पत्र लिहावं अन् तुमच्याशी (छोटासा) संवाद साधावा. तर, मी तुमच्या इयत्ता 6 वी ’ब’मधील एक विद्यार्थी. ज्याला तुम्ही पाचवीपासून ‘गंप्या’ म्हणतात… तो मी!

गुरुजी, परवा वडिलांनी शाळेत येत, तुमच्याकडून सहावीची सर्व पुस्तकं घेत, ती माझ्या हाती सोपवली अन् माझं मन खूप भरुन आलं.

पुस्तकं हाती आली. खूप आनंद झाला. त्यांना कव्हरं घालताना तुम्ही आठवलात. जून-15 पासून शाळा सुरू होईल…शाळेत आपलं खाऊ वगैरे देत स्वागत होईल… मित्र भेटत गप्पा होतील… नवी दप्तरं बघत आनंद होईल आणि वर्गात येत तुम्ही आम्हाला ‘उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय मजा केली…? वगैरे विचाराल… असं सारं सारं वाटलं होतं… पण नाहीच झाल्या या सार्‍या गमतीच्या गोष्टी या 15 जूनला!

आम्ही खूप हिरमुसलो. आई म्हणाली, भेटतील रे गुरुजी पुढच्या महिन्यात!’ मी त्याही महिन्याची वाट पाहिली. पण छे! तिथेही भेट नाही. पण गुरुजी, परवा मी ‘आजीच्या जवळीं घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवूनि ते कुठे अजुनि हे नाही कुणा ठाऊक’ ही कविता तुम्ही म्हणायला शिकवल्याप्रमाणे म्हणत होतो तेव्हा-

मौजेचे असले घड्याळ दडूनी कोठे तिने ठेविले? गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो! तरी ना मिळे!’ या ओळींवर थांबलो. रडू लागलो. आईबाबा म्हणाले, ‘का रडतोय रे?’ मी त्यांना म्हणालो. ‘आमचं असंच एक (शाळा नावाचं) घड्याळ गेल्या मार्च महिन्यापासून हरवलेय… कुठे ठेवलेय ते? माहीत आहे?’

गुरुजी, बाबा मला जवळ घेत म्हणाले, ‘बाळा, ते काही दिवसांपासून लपून बसलेय… पण ते सापडेल दसरा-दिवाळीनंतर.’ गुरुजी, खरंच सापडेल ते? सापडलं की शाळा, वर्ग, मित्र अन् माझ्यासह तुम्हीही भेटाल आम्हाला? भेटाल ना?

गुरुजी, आम्ही सर्वजण गावी आलोय. आजी-आजोबांकडे. परवा मी आजीबरोबर घरामागच्या छोट्याशा जमिनीवर ‘औषधी बगिचा’ फुलवीत होतो. त्या बगिचात आम्ही तुळस, जास्वंद, गुळवेल, अडुळसा, वेखंड, हळद, ब्राह्मी, गवती चहा, वाळा, आवळा यासारख्या औषधी वनस्पती लावत त्या वाढवल्याहेत. आजीशी मी जेव्हा या बागेसंबंधी बोलत होतो तेव्हा मला तुमचे ‘मैंने सुना, भूल गया, मैंने देखा, याद रहा, मैंने करके देखा, मैं समझ गया’ हे शब्द आठवले आणि केल्याने होत आहे रे’ची छानशी प्रचिती आली.

गुरुजी, आजीशी बोलत होतो तेवढ्यात ती माझ्या आईला म्हणाली, ’हेही दिवस सरतील गं!’ मी आजीला त्या वाक्याचा अर्थ विचारला. तिने छानसा समजावून सांगितला. गुरुजी, हेही दिवस खरंच सरतील ना हो? पुन्हा शाळा सुरू होत तुम्ही भेटाल ना? या कवितेच्या ओळींसह… ‘गोष्ट सांगतो तुझ्या हिताची, भल्या मुला तू ध्यानी धरी, प्रथम प्रयत्नी यश नच आले, फिरुनि एकदा यत्न करी.’

– तुमचा आज्ञाधारक विद्यार्थी, गंप्या.

चंद्रकांत भंडारी, जळगाव, 9890476538

- Advertisment -

ताज्या बातम्या