Friday, April 26, 2024
Homeजळगावगुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा

गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांनी एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने मंगळवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा (District Bank President) राजीनामा (resigned) कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे दिला. दरम्यान अध्यक्षपदासाठी राज्य सहकार निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा बँक निवडणुकीवेळी भाजपाने माघार घेतल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तत्कालीन महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाबाबत फॉर्म्युला निश्चित केला होता. त्यानुसार सुरूवातीचे तीन वर्षात राष्ट्रवादीचा अध्यक्ष नंतरचे दोन वर्ष शिवसेनेचा अध्यक्ष राहील असे ठरले होते.

तीन वर्षात प्रत्येक वर्षी बँकेच्या अध्यक्षपदासाठी इतरही संचालकांना संधी दिली जाईल अशी चर्चा झाली होती. सत्ता स्थापनेनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी मोठ्या राजकीय घडमोडी घडल्या होत्या. मात्र या सर्व घडामोडींवर मात करून गुलाबराव देवकर हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले होते. तेव्हा देवकर हेच तीन वर्ष चेअरमन राहतील असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र गुलाबराव देवकर यांचा अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येताच अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला होता.

संचालकांच्या बैठकीत निर्णय

निश्चीत झालेल्या फॉर्म्युल्यानुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष बदलविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी गत आठवड्यात संचालकांची बैठक घेतली होती. तेव्हा सोमवारी देवकर राजीनामा देतील असे सांगण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव सोमवारी देवकरांनी राजीनामा दिला नव्हता.

कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर देवकर यांनी मंगळवारी सकाळी 11 वा. जिल्हा मजूर फेडरेशन येथे बँकेचे एमडी देशमुख यांच्याकडे राजीनामा दिला. तसेच यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांनीही उपाध्यक्षपदाचा राजीनामा श्री. देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी माजी संचालक वाल्मिक पाटील हे उपस्थित होते.

संचित तोटे कमी केल्याचा आनंद

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर मोठी आव्हाने होती. बँकेचा संचित तोटा 97 कोटींपर्यंत पोहोचला होता. तो कमी करण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावेे लागले. मधुकर सहकारी साखर कारखाना आणि जे.टी. महाजन सुतगिरणीची विक्री झाल्याने संचित तोटा जवळपास 70 कोटींनी कमी झाला.

तसेच बँकेचा एनपीए देखिल पाच टक्क्यांनी कमी झाला. तसेच वसंत सहकारी साखर कारखान्याबाबत असलेल्या कायदेविषयक अडचणी काही प्रमाणात दूर करता आल्या. बँकेचे संचालक व कर्मचार्‍यांनी चांगले सहकार्य केल्यामुळे हे निर्णय घेता आले. वर्षभरात केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव देवकर यांनी दिली.

उपाध्यक्ष शिंदे गटाचाच होणार

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने उपाध्यक्षपदासाठी बँकेच्या संचालकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. निवडणूकीची तारीख जाहीर झाल्यानंतर ही चर्चा केली जाईल. उपाध्यक्ष हा शिंदे गटाचाच होणार हे मात्र निश्चीत असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

निवडणूक लागल्यानंतर चर्चा करु

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दिलेला आहे. आता निवडणुक लागल्यानंतरच अध्यक्षपदासाठी कुणाला संधी द्यायची याबाबत ठरविले जाईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या