महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असल्याने गुजरात सरकार सतर्क

jalgaon-digital
2 Min Read

नवापूर | श.प्र. NAVAPUR

महाराष्ट्र राज्यात दररोज २५ ते ३० हजार कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने गुजरात सरकार सतर्क झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून गुजरात राज्यात जाणार्‍या लोकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यासच प्रवेश दिला जात आहे. याबाबतचे परिपत्रक गुजरातच्या आरोग्य विभागाने काढले आहे. त्यावर गुजरात पोलीसांनी अंमलबजावणीही सुरू केली आहे.

उच्छल पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग व पोलीस दलाचे पथक तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात येणार्‍या प्रत्येक वाहनचालकांची तपासणी सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभाग व पोलिस दलाला देण्यात आले आहे.

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे अन्यथा महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छलहून महाराष्ट्रात परत पाठविण्यात येत आहे. गुजरात राज्यातील आरोग्य पथक २४ तास सीमावर्ती भागात वाहन चालकाची थर्मल स्कॅनिंग, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचा तपास करीत आहे.

तोंडाला मास्क नसल्यास गुजरात पोलीस एक हजार रूपयांचा दंड महामार्गावर वसूल करीत आहे. महाराष्ट्र पासिंग फोर व्हीलर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यातील अनेक वाहनचालकांना कुठलेही कारण ऐकून न घेता परतीचा प्रवास करावा लागला आहे.

गुजरात राज्यात जाण्यासाठी कोरोना रॅपिड किंवा आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट असणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील लोक मोठ्या संख्येने गुजरात राज्यात कोरोनाचा उपचारासाठी जात असल्याने त्यांची मोठी फसगत होणार आहे. नवापूर सीमा तपासणी नाक्यावर रॅपिड टेस्टिंगचे कॅम्प लावण्याने गुजरात राज्यात जाणार्‍यांची सोय होईल अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *