गाठी, रेवडी तयार करणार्‍या कारखान्यांमध्ये लगबग

jalgaon-digital
2 Min Read

शेवगाव | Shevgav

अवघ्या चार दिवसावर येवुन ठेपलेल्या गुढीपाड्व्याच्या सणानिमीत्त शेवगावला साखर गाठी व रेवडी तयार करणार्‍या व्यावसायिकांची लगबग वाढली आहे. करोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा चांगल्या प्रकारे सण साजरा होणार असल्याने यातील उलाढाल वाढणार आहेच परंतु वाढत्या महागाईने गाठीच्या किंमतीही वाढणार असल्याचे चित्र आहे.

साधारणपणे होळीच्या सणापासून साखर गाठी तयार करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे दीड ते दोन महिने शेवगाव येथील साखर गाठी तयार करणारे कारखाने जोमात चालतात. श्री क्षेत्र पैठण येथील नाथ षष्टी, मढी येथील कानिफनाथांचा यात्रोत्सव, फुलबाग यात्रा याशिवाय गावोगावच्या वार्षिक यात्रोत्सवात साखर गाठी व रेवडींची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामहामारी व त्यामुळे विविध यात्रोत्सवावर कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका छोट्या लघु उद्योगांना सहन करावा लागला. त्यामुळे गेली दोन वर्ष साखर गाठी तयार करणार्‍या या लघु उद्योगाची उलाढाल कमालीची मंदावली होती.

मात्र गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा कहर काही प्रमाणात नियंत्रणात आल्याने यंदा विविध यात्रोत्सवांना प्रशासनाने मंजुरी दिल्याने यंदाच्या वर्षी विविध छोट्या, मोठ्या लघु उद्योगासह साखर गाठी आणि रेवडी तयार करणा-या छोट्या व्यावसायिकांचा उत्साह अधिक प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येत आहे. शेवगाव येथील जयेश मुकुंद भोकरे, कमलेश लांडगे, भाऊ परदेशी, विक्की परदेशी यांच्याकडे तयार होणा-या साखर गाठी व रेवडीला परिसरातून मोठी मागणी असते.

मात्र गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा साजर्‍या होणार्‍या विविध गावातील यात्रोत्सवात स्वतः तयार केलेल्या शेवगाव परिसरातील कारागीरांच्या साखर गाठी आणि रेवडीची दरवर्षी दिसणारी उलाढाल यंदा काही प्रमाणात वाढणार असल्याने या लघु उद्योग क्षेत्रातील कारागिरांना अच्छे दिन आल्याचे सुखावह चित्र दिसून येत आहे.

यंदा साखरेच्या भावात झालेली काही प्रमाणात वाढ तसेच मजुरांच्या मजुरीत देखील झालेली वाढ याशिवाय पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या दरामुळे दळण वळणाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे यंदा गुढीपाडव्यासाठी आवश्यक असणार्‍या गाठींच्या किंमती वाढल्या आहेत.

– जयेश भोकरे, व्यावसायिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *