Thursday, April 25, 2024
Homeनगरकेंद्राचे मल्टीस्टेटचे कायदे राज्य घटनेच्या विरोधात

केंद्राचे मल्टीस्टेटचे कायदे राज्य घटनेच्या विरोधात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारकडून सहकाराचे गोंडस नाव देऊन मल्टीस्टेट संस्था पोटनियमातून घटनाविरोधी तरतुदी केल्या जात आहेत. भाजपने केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत सहकार परिषदेला आम्हाला निमंत्रित केल असते तर आपण ही बाब केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या निदर्शनास आणली असती, असा उपहासात्मक टोला ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. तसेच मल्टीस्टेटचे कायदे हे राज्य घटनेच्या विरोधात असल्याचा आरोप केला.

- Advertisement -

जिल्ह्यातील करोना आणि संभाव्य ओमिक्रॉनच्या लाटेचा उपाययोजना आढावा घेण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ नगरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शनिवारी लोणीला झालेली सहकार परिषद ही भाजपची होती. त्या सहकार परिषदेला राज्यातील सहकारात काम करणार्‍यांना बोलविण्यात आले नाही. वास्तवात सहकार हा विषय राज्याचा आहे. ज्या संस्था दोन राज्यात कार्यरत असतात. त्यांना मल्टीस्टेट संस्थांचा दर्जा मिळतो. केंद्राचा सहकार हा मल्टीस्टेट संस्थांना लागू होतो. मल्टीस्टेटचे कायदे घातक आहेत. हे कायदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटने विरोधात आहेत.

लोणीच्या सहकार परिषदेला आम्हाला बोलावले असते, तर मल्टीस्टेटच्या जाचक कायद्याविषय केंंद्रीय सहकार मंत्र्यांना अवगत करून दिले असते. अनेक मल्टीस्टेट संस्था पोटनियम दुरुस्ती करून घटनाविरोधी तरतुदी करत आहेत. काही साखर कारखाने, संस्थेतील सत्ताधारी तर निवडणुकीत आपल्या विरोधात कोणी उभेच राहूच नये, यादृष्टीने पोटनियम करत आहेत. अनेक पोटनियम सभासदांवर अन्याय करणारे आहेत, त्याला लगाम लावण्याची आवश्यकता आहे. सहकार वाढीला लागावा, संस्थांचा व्यवसाय परराज्यात व्हावा, यासाठी राज्य सरकार नाहरकत प्रमाणपत्र देते, मात्र त्याचा भ्रष्टाचारी लोक गैरवापर करतात, असाही दावा मुश्रीफ यांनी केला.

राज्यातील ज्या संस्था राज्याच्या सहकार विभागाला घाबरतात त्याच मल्टीस्टेटचा दर्जा मिळवत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. दुसरीकडे सहकारी संस्था चालकांनी मालक म्हणून नव्हे तर विश्वस्त काम पाहवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या येत्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहेत. शिक्षकांच्या बदल्यासाठी लवकर ऑनलाईन सॉफ्टवेअर विकासीत करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली.

शाह आणि माझा दौरा योगायोग

शनिवारी लोणीत केेंद्रीय सहकार मंत्री अमित शाहा यांचा दौरा असतांना पालकमंत्री यांनी नगरला बैठक लावत प्रशासनाला तिकडे जावून दिले नाही का, असा प्रश्न विचारला असता हा निव्वळ योगायोग आहे. जिल्ह्यातील कोविडचा आढावा आणि तीन नगरपंचायतींच्या प्रचारासाठी आपण आलेले असून 20 तारखेला कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी उमेदवारी माघारीचा दिवस असल्याने त्यानंतर जिल्ह्यात दौरा करणे शक्य नव्हते, यामुळेच नगरला शनिवारी आलो असे मुश्रीफ म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या