Friday, April 26, 2024
Homeनगरपटवापटवीचा प्रयत्न फोल

पटवापटवीचा प्रयत्न फोल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरऐवजी कोल्हापूरचे पालकमंत्रीपद पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून पुन्हा नव्याने सुरू आहेत. मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीच्या ऑफरकडे कानाडोळा करण्याचे धोरण कायम ठेवल्याने राजकीय पटवापटवीचे प्रयत्न फोल ठरल्याचे दिसत आहे. याच घडामोडींमुळे नगरच्या पालकमंत्री बदलाचा तिढा सोडविण्यात राष्ट्रवादीला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे मुश्रीफ यांच्यानंतर पालकमंत्री कोण यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादी एक्स्चेंज करणार का, हा प्रश्नही चर्चेत आला आहे.

- Advertisement -

नगरच्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडे पाच महिन्यांपूर्वी केली होती. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादीला नगरपेक्षा कोल्हापूर येथील पालकमंत्रीपदात अधिक इंटरेस्ट आहे. यासाठी नगर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदात बदल करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. नगरचे पालकमंत्रीपद काँग्रेसला देण्याची चाचपणी पुन्हा राष्ट्रवादीकडून करण्यात आली असली तरी त्यात यश आलेले नाही.

नगरच्या पालकमंत्रीपदी कोल्हापूर जिल्ह्यातील जेष्ठ नेत तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संधी देण्यात आली. मात्र, सुरूवातीपासून मुश्रीफ नगरमध्ये रमले नाहीत. कोल्हापूर ते नगर अंतर आणि अन्य कारणे देवून नगरला पूर्णपणे न्याय देवू शकत नाहीत, असे त्यांनीच अनेकदा सांगीतले. याच कारणांमुळे पाच महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नगरच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीआडून कोल्हापुरवर डोळा ठेवण्यात आला आहे.

नगरचे पालकमंत्रीपद काँग्रेसला देवून त्या बदल्यात कोल्हापूरचे पालकमंत्रीपद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून पुन्हा सुरू झाले आहे. मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्रीपद सोडण्यास काँग्रेस अजिबात इच्छुक नाही. यामुळे नगर-कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाचे ऐक्स्चेंज थांबले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काँग्रेसने राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दिले आहे. पाटील यांच्याकडून हे पद काढून राष्ट्रवादीला देण्यास काँग्रेसचा विरोध आहे.

कोल्हापूरात पाटील यांना राजकीय बळ देण्यासाठी काँग्रेस हे पद सोडण्यास तयार नाही. तर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पॉवरफुल करण्यासाठी हे पद हवे आहे. भविष्यातील राजकरणासाठी नगरपेक्षा कोल्हापूरचे पालकमंत्रीपद अधिक फायद्याचे आहे, असे मुश्रीफ समर्थकांना वाटते. त्यामुळेच मुश्रीफ यांच्या गोटातून पक्षप्रमुखांकडे अदलाबदलीचा प्रस्ताव रेटला जात असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या