Saturday, April 27, 2024
Homeनगर12 गटशिक्षणाधिकार्‍यांना नोटिसा

12 गटशिक्षणाधिकार्‍यांना नोटिसा

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

मागील आठवड्यात ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या 31 जुलैपूर्वी करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार 21 तारखेपर्यंत जिल्ह्यातील 14 गटशिक्षणाधिकार्‍यांनी तालुकानिहाय बदली पात्र शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी पाठविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले होते. मात्र, जिल्ह्यातील शेवगाव आणि कर्जत वगळता अन्य तालुक्यांनी वेळेवर माहिती न सादर केल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित 12 गटशिक्षणाधिकार्‍यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला 15 जुलैला राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत आदेश मिळाले होते. यात यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने न करता त्या ऑफलाईन पध्दतीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील बदलीपात्र शिक्षक यातून अधिकारप्राप्त शिक्षक आणि संवर्ग-1, संवर्ग-2 मध्ये बदलीसाठी पात्र असणार्‍या शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेने चार दिवसांत म्हणजेच 21 जुलैला सायंकाळी पाचपर्यंत विहित नमुना आणि मुदतीत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. ही माहिती वेळेवर सादर न करणार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता.

मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहिने गटशिक्षणाधिकार्‍यांना चार दिवसांपूर्वी पत्र पाठवून कोणत्या नमुन्यात माहिती भरून पाठवयाची आहे, याचा नमुना पाठवूनही जिल्ह्यातील शेवगाव आणि कर्जत वगळता अन्य गटशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला मंगळवारी सायंकाळपर्यंत माहिती पाठविली नव्हती. यामुळे शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 12 गटशिक्षणाधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

शिक्षण विभागातील अधिकार्‍यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर काल रात्री उशीरा शिक्षक बदलीची माहिती पाठविण्यात आल्याचे मॅसेज गटशिक्षणाधिकार्‍यांकडून पाठविण्यात येत होते. मात्र, पाच वाजता मुदत संपल्यानंतर शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस धाडल्या आहेत.

आज जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागातील लिपीक संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. या बदलीच्या प्रक्रियेची तयारी करण्यात काल दिवसभर शिक्षणाधिकारी आणि त्यांचे कर्मचारी व्यस्त होते. आज कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर पुन्हा शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत शिक्षण विभाग गुंतणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या