Friday, April 26, 2024
Homeनगरगटविकास अधिकार्‍यांना पोलीस संरक्षण मिळावे

गटविकास अधिकार्‍यांना पोलीस संरक्षण मिळावे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

श्रीगोंदा येथील गटविकास अधिकार्‍यांना धक्काबुक्की, शिवीगाळ व धमकी देणार्‍या आरोपीवर कडक कारवाई व्हावी, तसेच गटविकास अधिकार्‍यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली.

- Advertisement -

श्रीगोंदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) दत्तात्रय काळे यांना सोमवारी (दि. 21) बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी लोणी व्यंकनाथ येथील सरपंचावर अपात्रतेची कारवाई प्रस्तावित केल्याच्या रागातून शिविगाळ, धक्काबुक्की व धमकी दिली. याबाबत बीडीओ काळे यांनी रितसर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नाहाटा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी व आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजपत्रित अधिकारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी संघटनेचे सरचिटणीस तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) वासुदेव सोळंके, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव, संगमनेरचे बीडीओ सुरेश शिंदे, राहात्याचे बीडीओ समर्थ शेवाळे, कोपरगावें बीडीओ सचिन सूर्यवंशी, नगरचे बीडीओ सचिन धाडगे, शेवगावचे बीडीओ महेश डोके, नेवाशाचे बीडीओ शेखर शेलार, पारनेरचे बीडीओ किशोर माने, कर्जतचे बीडीओ अमोल जाधव, राहुरीचे बीडीओ गोविंद खामकर, अनंत परदेशी, एकनाथ चौधरी, ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, विठ्ठलराव गुंजाळ आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेत पोलीस चेक पोस्ट उभारावे

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना संरक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषदस्तरावर पोलीस चेक पोस्ट व पंचायत समिती स्तरावर पोलीस यंत्रणा ठेवणेबाबत संबंधित यंत्रणेस आदेशित करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या