जिल्ह्यात भूजल पातळीत वाढ

नाशिक । सुधाकर गोडसे Nashik

यंदा मान्सून चांगला बरसल्याने बळीराजाचे खरीप हंगामातील दुबार पेरणीचे संकट टळले असून दमदार पर्जन्यवृष्टीमुळे खरीपासह रब्बीचा हंगाम यशस्वी होणार याचे संकेत मिळत आहेत.

गत वर्षीच्या तुलनेत यंदा देखील पावसाचे प्रमाण चांगले असून अद्यापही परतीचा पाऊस ठाण मांडून आहे. पावसामुळे नदीनाल्यांना आलेले पूर व त्याची परिणती भूजल पातळीत पाण्याच्या वाढीत झाली आहे. दोन वर्षी पूर्वी पावसाअभावी पिके जळत होती.

यंदा जास्त पावसामुळे ते पाण्यात बुडत आहेत. खरीप पिकांची तालुक्यात 95 टक्के लागवड झाली असून त्यात सोयाबीन, मका, द्राक्ष, भाजीपाला, ऊस, भात, कडधान्य आदींचा समावेश आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप न दिल्याने व पिकांना सुर्यप्रकाश न मिळाल्याने अनेक पिकांची वाढ खुंटली गेली. मात्र परतीच्या पावसाने पिकांनी जोर पकडला असून अवघ्या आठवडाभरातच पिके डोमदार दिसून लागली आहेत.

भूजल पातळीत पाण्याची वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांसह इतर परिसरातील विहिरी काठोकाठ भरल्याचे चित्र आहे. जास्त पावसामुळे ऊसाच्या वजनात वाढ होणार असून ऑक्टोबरमध्ये द्राक्षबागांची छाटणी सुरू होणार आहे.

यंदा थंडीचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत असून पिकांवरील रोगाचे प्रमाण कमी होणार आहे. सद्यस्थितीत सोयाबीन,भात, व कडधान्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तालुक्यात दारणा, गोदावरी, आळंदी, वालदेवी आदी नद्या भरभरून वाहात असून सिंचनासाठी त्याचा लाभ होणार असल्याने आगामी रब्बी हंगामात बळीराजाला सुगीचे दिवस येणार हे निश्चित.

तालुक्यातील नद्या, धरणे, केटी वेअर ओसंडून वाहात असल्याने आगामी काळात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. वीज पुरवठा सुरळीत राहिल्यास बळीराजाच्या दृष्टीने उत्पन्नवाढीसाठी रब्बी हंगाम लाभदायी ठरू शकतो. याशिवाय ऊसाच्या वजनात वाढ होणार असल्याने अशा शेतकर्यांना आर्थिक सुबत्ता मिळू शकते. भाताचे पिक यंदा जोमदार असल्याने त्याच्या उत्पादनात होणारी वाढदेखील सुखदायी ठरणार आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *