Wednesday, April 24, 2024
Homeनगरग्रीन केलवड, रेन केलवड उपक्रमाचे महंत रामगिरी महाराजांकडून कौतुक

ग्रीन केलवड, रेन केलवड उपक्रमाचे महंत रामगिरी महाराजांकडून कौतुक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

ग्रीन केलवड, रेन केलवड, या तरुणांनी सुरू केलेल्या गावातील वृक्षारोपण, व त्यांचे संवर्धन करण्याच्या प्रकल्पाचे महंत रामगिरी महाराज यांनी कौतुक केले.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील केलवड हे जिरायती टापूतील गाव आहे. या भागातील शेती पावसावर अवलंबून आहे. यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी दुष्काळ या जिरायती टापूतील गावांच्या पाचवीला पुजलेला असतो.

झाडे कमी झाली, पाऊस कमी पडतो, हे ओळखून गावात वृक्षारोपण मोहीम राबविली पाहिजे या हेतूने केलवड येथील तरुण नितीन गमे, संजय सोनवणे, भाउनाथ गमे आदी तरुण एकत्र येऊन त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावात गेल्या दोन वर्षांपासून ग्रीन केलवडचे स्वप्न साकारण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला.

निव्वळ वृक्षारोपणच नव्हे तर त्यांचे संगोपन करून ते प्रत्यक्षात वाढविण्यासाठीही ही तरुणाई प्रयत्न करत आहे. यासाठी काही आर्थिक मदत गावातील काही जाणकार, सामाजिक आवड असलेल्या ग्रामस्थांनी दिली. त्यातून रोपे आणणे, त्यांच्या संरक्षणासाठी कंपाउंड करणे यासाठी ही मदत मोलाची ठरली.

गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला तसेच श्रीज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना हजारो रोपटे घरी लावण्यासाठी दिली. योग्य मार्गदर्शन करून त्याची जोपासना करून ते जर योग्य वाढलेले असेल तर त्यासाठी विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्याचेही त्यांनी जाहीर केले. विद्यार्थ्यांनी ही नेलेली रोपे शिक्षकांच्या तसेच या तरुणांच्या मार्गदर्शनाने लावली आहेत.

साईबाबा संस्थानमध्ये सेवेत असलेले संजय सोनवणे हा तरुण या गावात लावलेल्या झाडांची ड्युटीवर आल्यावर देखभाल करतो. भर उन्हाळ्यात या तरुणाने सायकलला ड्रम लावून पाणी आणले व झाडांना टाकले. शिवाय लावलेल्या झाडांच्या कडेने उगवलेले गवतही हा तरुण स्वत: काढतो. त्याच्या उपक्रमाचेही कौतुक होत आहे. केलवड गावात अनेक ठिकाणी या तरुणांनी लावलेली झाडे डोलाने उभी आहेत.

महंत रामगिरी महाराज केलवड येथे आले असता, त्यांच्या हस्ते केलवडच्या विरभद्र मंदिरासमोर वृक्षारोपण करण्यात आले. महंत रामगिरी महाराजांनी केलवड च्या ग्रामस्थांचे कौतुक करत या तरुणांच्या ग्रीन केलवड, रेन केलवड या उपक्रमाचे कौतुक केले. झाडे लावा, झाडे जगवा यासाठी तरुण चांगले काम करत आहेत, असे महाराजांनी या तरुणांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.या उपक्रमाला ग्रामस्थ अर्थिक मदत करत असल्याने ग्रामस्थांचेही त्यांनी कौतुक केले.

तरुणांनी वेळ द्यावा!

वृक्षारोपन करणे व त्यांचे संरक्षण करणे यांची मला आवड आहे. गावातील अन्य तरुणांनीही या ग्रीन केलवड, रेन केलवड या उपक्रमात सहभागी व्हावे. गावातील तरुणाई झाडे लावणे आणि त्यांचे संगोपनात आपला वेळ देवु शकली तर केलवड ग्रीन होईल. असे मत या प्रकल्पातील तरुण व साईसंस्थानचे कर्मचारी संजय सोनवणे यांनी सांगितले. झाडे लावले तर चांगला पाउस पडेल असेही संजय सोनवणे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या