Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसणानिमित्त विशेष रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा

सणानिमित्त विशेष रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

कुटूंबाला परवडणारे व सुरक्षित वाहन म्हणून रेल्वेला पहिली पसंत असते. करोनामुळे नेहमीच्या प्रवासी रेल्वेगाड्या सुरु नसल्या तरी फेस्टिव्हल आणि रेग्युलर गाड्या नाशिकरोड, मनमाड, भुसावळ रेल्वेस्थानकात थांबत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे.

- Advertisement -

दिवाळीची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दहा दिवसांपासून 34 फेस्टिवल स्पेशल गाड्या सुरु केल्या असून रेग्युलर 56 गाड्या सोडल्या आहेत. फेस्टिवल गाड्यांचे भाडे 10 ते 30 टक्के जादा असून पंचवटी, मंगलासारख्या रेग्युलर गाड्यांचे भाडे पूर्वीप्रमाणेच आहे.

नेहमीच्या प्रवासी गाड्या बंद असल्याने रेल्वेचा दिवसाला कोट्यवधीचा तोटा होत आहे. मालगाड्या व पार्सल ट्रेन तो भरून काढत आहेत. दिवाळीत प्रवाशी गाड्यांव्दारे रेल्वेला चांगला महसूल मिळत आहे. स्थानकावरील रिक्षाचालक, खाद्यपदार्थ विक्रेते, कुली, पार्किंग ठेकेदार यांनाही दिवाळीत बरे दिवस आले आहेत.

आरक्षण सक्तीचे

प्रवाशांना रेल्वेस्टेशनवर येऊन किंवा आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर आरक्षण करता येते. नाशिकरोडला सिन्नरफाटा रेल्वेगेटवर तसेच शहरात तिबेटीयन मार्केट येथे आरक्षण केंद्र आहे. नाशिकरोडपेक्षा तिबेटीयन मार्केट केंद्रात रेल्वेला जास्त महसूल मिळतो. वर्षाला तो वीस कोटींच्यावर असतो. आरक्षण दोन तास तसेच प्रसंगी अर्धा तास आधीही करता येते.

फेस्टिवल व रेग्युलरसह सर्व गाड्यांना आरक्षण सक्तीचे असून गाडी सुटण्याच्या आधी दीड तास रेल्वे स्थानकावर हजर राहावे लागते. त्यामुळे रेग्युलर गाड्यांना प्रतिसाद कमी आहे. मनमाड-धर्माबाद गाडी त्यामुळेच बंद झाली. महाराष्ट्रात एक जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी रेल्वेगाड्यांना प्रतिबंध आहेत. उत्तरप्रदेश, बिहारसारख्या दूरवरच्या राज्यात जाणार्‍या गाड्यांना मात्र उत्तम प्रतिसाद आहे.

महिलांना दिलासा

नाशिकरोडला रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) बंदोबस्त वाढवल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक नरसिंह गुहिलोत यांनी दिली. ते म्हणाले की, महिला प्रवाशांना छेडछाड, अत्याचारापासून संरक्षणासाठी मेरी सहेली उपक्रम सुरु केला आहे. महिला प्रवाशांना मदतीसाठी प्रत्येक रेल्वेगाडी तसेच स्थानकात आरपीएफच्या महिला सेवकांचे पथक नेमले आहे. महिला प्रवाशांना रात्री घरी जाण्यास असुरिक्षत वाटल्यास त्यांना आरपीएफचे वाहन व सेवक उपलब्ध केले जातात. उपनिरीक्षक डी. पी. झगडे, उपनिरीक्षक शर्मा व सहकारी यासाठी प्रयत्न करत आहेत.

या गाड्या थांबतील

मुंबईला जाणार्‍या-येणार्‍या पुढील गाड्या भुसावळ, मनमाड, नाशिकरोडला थांबतील.

फेस्टिवल गाड्या – मुंबई-जनता महानगरी कृषीनगर, महानगरी पुष्पक, महानगरी, पुष्पक, पाटलीपुत्र, काशी एक्सप्रेस, मुंबई एलटीटी-हरिव्दार, एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-कामाख्या, एलटीटी-भुवनेश्वर, एलटीटी-कानपूर, मुंबई-छपरा.

रेग्युलर गाड्या – पंचवटी, मंगला, नंदीग्राम (मुंबई-आदिलाबाद), पवन, गरीबरथ, विदर्भ, दुरांतो, नागूपर-मुंबई, गोदान,एलटीटी-गुवाहटी. आठवड्यातून एकदा सुटणार्‍या गाड्या- एलटीटी लखनौ- एलटीटी-मंडुआ, एलटीटी-पुरी, मुंबई-गोरखपूर आदी.

- Advertisment -

ताज्या बातम्या