Friday, April 26, 2024
Homeनगरग्रामसेवकांसह प्रशासकही मुख्यालयाहून गायब

ग्रामसेवकांसह प्रशासकही मुख्यालयाहून गायब

टिळकनगर |वार्ताहर| Tilknagar

आता शासनाने ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने सरपंच म्हणून शासकीय अधिकारी-कर्मचार्‍याची प्रशासक म्हणून नियुक्ती केली अन्

- Advertisement -

आता ग्रामसेवकापाठोपाठ प्रशासकही शहरवासी असल्याने ते शहरातून कधीतरी ये-जा करीत मुख्यालयी येत असल्याने गावपातळीवरच्या विकासकामांना खिळ बसून दैनंदिन कामाचा खोळंबा होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ग्रामपंचायतींची ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच वर्षांची मुदत संपल्याने शासनाने ग्रामपंचायतीवर शासकीय अधिकारी-कर्मचारी प्रशासक म्हणून नियुक्त केले. आणि गावपातळीवर सरपंच, सदस्यांचा दबदबा संपला.

ग्रामस्थांची कामे मार्गी लावण्यात सरपंच प्रभावी भूमिका बजावत असत. त्यामुळे ग्रामसेवक ग्रामपंचायतीकडे महिनोगणती फिरकत नसले, तरीही सरपंचच वेळ मारून कामे पुढे रेटून नेत असत. मात्र आता ग्रामसेवकासह प्रशासकही शहरवासी होऊन ते ये-जा झाल्याने परिणामी त्यांच्या दौर्‍याचा ताळमेळ अजूनही बसलेला नाही.

ग्रामसेवक एखाद्या दिवशी येतात. प्रशासक तर कधी येतात हे समजतही नाही. प्रशासकांनी ग्रामसेवकांना तुम्हीच सांभाळून घ्या, असं म्हणत सर्वाधिकार दिल्याचे काही अंशी दिसून येते.

जिल्ह्यासह तालुक्यातील शेकडो ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. परिणामी आता ग्रामपंचायतींसह मूळ कामकाज प्रशासकाकडे, तर ग्रामसेवकांकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतीची अतिरिक्त जबाबदारी असल्याने त्यांना वेळ मारून नेण्याची नामी संधीच सापडली आहे.

प्रशासकपदी मुख्याध्यापक, विस्तारधिकारी, शाखा अभियंते, कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकाची वर्णी लागली आहे. यातील सत्तर टक्के अधिकारी-कर्मचारी शहरवासी होऊन ग्रामीण भागात येथून ये-जा करत असल्याने आता ग्रामस्थांना आपल्या सरकारी कामांसाठी तालुक्याला किंवा इतर ठिकाणी जावे लागते. कामासाठी त्यांचा शोध घ्यावा लागतो. तेथेही ते भेटतील याची शाश्वती नसते. त्यांच्याशी संपर्क साधल्यास दौर्‍यावर किंवा दुसर्‍या गावांत असल्याचे उत्तर मिळते.

या महिन्यात प्रशासकांनी कोणते विशेष काम केले हे शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे, ते गावात येत नाहीत. शासकीय कर्मचारी-अधिकारी मुख्यालयी राहावे हे नियम न पाळण्यासाठीच नियमावली बनविण्यात आली की काय अशी शंका येऊ लागली आहे. ग्रामसेवकापाठोपाठ प्रशासकही मुख्यालयी राहत नाही, ते शहरवासी झाले आहेत. याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. ग्रामसेवकासह प्रशासक जर गावाकडे येणार नसतील तर काय उपयोग?

अध्यक्ष-सचिव गावाच्या उपयोगी न पडता केवळ वेळ मारून नेण्याचे काम सुरू आहे. गावाचा गावगाडा आता रामभरोसे सुरू आहे, असे अनेक माजी सरपंचाचे म्हणणे आहे. मुख्यालयी दांडी मारणार्‍यांवर प्रशासन काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्रशासकपदी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍यांकडे आधीच अनेक कामे आहेत. त्यातच ते व्यस्त असतात. सोबतच त्यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण अधिकच वाढला आहे. सध्या करोनामुळेही अनेक कामे वाढली आहेत.

त्यामुळे अधिकारी ग्रामपंचायतीकडे जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यासह तालुक्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नाल्या तुंबल्या आहेत. मात्र नाले सफाई किंवा रस्त्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. त्यामुळे गावगाड्याचा कारभार सध्या प्रभावीत झाला आहे.

गावांत प्रशासक येतच नाहीत. त्यामुळे गावातील विकासकामे ठप्प आहेत. ग्रामस्थांची अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली असल्याने निवडणूक लवकरात लवकर घ्यायला हवी, अशी जोरदार मागणी अनेकांनी आता बोलून दाखविली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या