Friday, April 26, 2024
Homeनाशिकहवशा नवशा गवश्यांनी ग्रामपंचायतीचे वाटोळं करू नका

हवशा नवशा गवश्यांनी ग्रामपंचायतीचे वाटोळं करू नका

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यात साठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून गावा-गावात वातावरण तापू लागले आहे. सोशल मीडियात अनेक खरमरीत चर्चांना सध्या उधान आले असून वेगवेगळे दाखले देत जनजागृती होताना दिसून येत आहे.

- Advertisement -

सोशल मीडियात महाराष्ट्रातील प्रख्यात पाटोदा गावाचे सरपंच भास्करराव पेरे- पाटिल यांच्या भाषणाचे व ह.भ.प.निवृती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनाचे व्हिडिओ व चित्रफिती पाठवून गावाचा सरपंच कसा असावा? यासंदर्भात जनजागृती केली जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.

तालुक्यातील प्रत्येक गावात वार्डरचना जाहीर झाल्यानंतर सगळ्याच इच्छुकांचे डोळे सरपंच पदाच्या सोडतीकडे लागले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या नवीन आदेशानुसार सरपंच पदाचे आरक्षण आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीच्या नंतर ठेवण्यात आलेले आहे.

त्यामुळे सरंपचपदाच्या रेसमध्ये असणा-या उमेदवाराची निराशा झाली आहे. दिंडोरी तालुक्यात बहुतांशी ग्रामपंचायती या आरक्षित असल्याने फार थोड्याच ग्रामपंचायती मध्ये सरपंचपद हे सर्वसाधारण वर्गासाठी खुले होणार आहे.

मात्र, सरपंचपद हे कायम आरक्षित असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी चुरस पाहायला मिळत आहे.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये ग्रामपंचायत मध्ये सरपंचपद हे वर्षानुवर्ष आरक्षित असल्यामुळे या गावामधील निवडणुक ही उपसरपंच पदासाठी कायमच प्रतिष्ठेची होत असते. या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच सर्वसाधारण खुल्या वर्गातील व्यकतीला राजीखुशीने दिले जाते परंतु आता या उपसरपंच पदासाठी काही गावा मध्ये मोठी चुरस पाहण्यास मिळत आहे.

त्यात अनेक गावामध्ये विकासाचा मुद्दा समोर येत आहे. त्यात अनेक गावामध्ये पथदिपावर मोठ्या प्रमाणावर खर्च पाहावयास मिळत आहे. तर काही गावामध्ये मुरूम टाकण्यासाठी लाखोचा निधी खर्च झाल्यांचे पाहण्यास मिळत आहे.

काही गावामध्ये स्वातंत्र्यानंतर आता कुठे तरी विकासाला सुरुवात झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आतापर्यत विकासकामे का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित राहतो आहे.

अनेक ग्रामपंचायतीना उत्पन्नाचे कुठेही साधन नसल्यामुळे पेसा व 14 वित्त आयोग यावरच अवलंबून राहवे लागते. तसेच घरपट्टी, पाणीपट्टी नागरिक वेळेवर भरत नाही त्यात अनेक लोक हे मळ्यात राहत असल्यामुळे त्यांना तर आपल्याही घरपट्टी भरावी लागते.

हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस माहित होत आहे. त्यामुळे गाव पातळीवर निवडणुकीचे अनेक किस्से ऐकण्यास मिळत आहे. सध्या तरी ग्रामपंचायत निवडणुक असणा-यां गावामध्ये व्हाट्सअप ग्रुपवर राज्यातील नामवंत सरपंच भास्करराव पेरे- पाटील व ह. भ.प.निवृती महाराज इंदोरीकर यांचे ग्रामपंचायत विकासासंदर्भात अनेक व्हिडिओ व संभाषणाच्या चित्रफिती व्हायरल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीला चांगलाच रंग भरला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या