Friday, April 26, 2024
Homeनाशिकप्रस्थापितांना धक्का!; महाविकास आघाडीचा जोर, अनेक ठिकाणी परिवर्तन

प्रस्थापितांना धक्का!; महाविकास आघाडीचा जोर, अनेक ठिकाणी परिवर्तन

नाशिक । Nashik (विजय गिते)

विधानपरिषद निवडणुकीनंतर गावपातळीवरही महाविकास आघाडीने जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत देखील जोरदार मुसंडी मारली आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सिन्नरचे आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांना भावानेच जोर का धक्का दिला. कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या मालेगाव तालुक्यात शिवसेनेचा भगवा अव्वल ठरला आहे.

- Advertisement -

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला तालुक्यात सत्ताधार्‍यांना धक्का बसला असून अनेक ठिकाणी परिवर्तन झाले समोर आले आहे. निफाड तालुक्यात शिवसेनेची पीछेहाट झाली असून, राष्ट्रवादीची सरशी झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लासलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक विरोधक जयदत्त होळकर व नानासाहेब पाटील एकत्र आले होते. त्यांना भाजपचे डी. के. जगताप यांनी टक्कर दिली. यात होळकर-पाटील गटाने वर्चस्व मिळवले खरे. मात्र, होळकर यांची पत्नी वेदिका होळकर याचा भाजप महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा जगताप यांनी धक्कादायक पराभव केला. राष्ट्रवादीचे आमदार अ‍ॅड. कोकाटे यांना भावानेच धक्का दिला.

माणिकराव कोकटेंचा सख्खा भाऊ भरत कोकाटेंकडून पराभूत झाला. सिन्नर तालुक्यातील सोमठाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भरत कोकटे यांच्या पॅनलला 7 तर माणिकराव कोकाटे पॅनलला केवळ 4 जागा मिळाल्या. मालेगाव तालुक्यात शिवसेनेचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री भुसे यांनी तालुक्यात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मालेगाव तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर भगवा फडकला आहे.

पालकमंत्री भुजबळ यांच्या येवला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे. सत्तेसाठी एकत्र आलेल्या अंदरसूल ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे व मकरंद सोनवणे यांना मतदारांनी नाकारले आहे. नगरसूल ग्रामपंचायतीत सुनील पैठणकर व प्रमोद पाटील यांच्या पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले.अंगणगाव ग्रामपंचायतवर मात्र ज्येष्ठ नेते अंबादास बनकर व जि.प. सभापती संजय बनकर यांनी एकहाती सत्ता आणली आहे.

निफाड तालुक्यात राष्ट्रवादी विरूध्द शिवसेना अशा लढतीत राष्ट्रवादीने बाजी मारल्याने आमदार दिलीप बनकर याचा वरचष्मा राहिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या शिवडी ग्रामपंचायतीत त्यांना पराभव स्विकारावा लागला.

वनसगाव व उगाव ग्रामपंचायतींत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे यांचे कोठुरे ग्रामपंचायतीत पॅनेल विजयी झाले परंतू, पत्नीला पराभवाचा सामना करावा लागला .

बागलाण, चांदवड व देवळा या भाजप आमदारांच्या तालुक्यांमधील ग्रामपंचायती निवडणुकीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाजप आमदार दिलीप बोरसे यांनी अनेक ग्रामपंचायती खेचून आणल्या. नांदगाव तालुक्यातील आमदार सुहास कांदे यांनी अनेक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. न्यायडोंगरी ग्रामपंचायतींत माजी आमदार अनिल आहेर व जि.प. सभापती आश्विनी आहेर यांच्या परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर आमदार हिरामण खोसकर यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या