ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत म्हैसगावला भाजपा, राहुरी खुर्दला राष्ट्रवादी तर आरडगावात वंचितचा विजय

jalgaon-digital
2 Min Read

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होऊन चार जागांसाठी मतदान घेण्यात आले. काल मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. यामध्ये म्हैसगाव येथील दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. राहुरी खुर्द येथे राष्ट्रवादी तसेच आरडगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने विजय मिळवून झेंडा फडकावला.

राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत येथील दोन, राहुरी खुर्द ग्रामपंचायत येथील एक तर आरडगाव ग्रामपंचायत येथील एक अशा चार जागा रिक्त झाल्या होत्या. या चार जागांसाठी दि. 21 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. काल दि. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. यात म्हैसगाव येथील वॉर्ड क्रमांक एकमध्ये भाजप प्रणित विकास मंडळाचे मोहनदास विनायक विधाटे व राष्ट्रवादी प्रणित जनसेवा मंडळाचे किरण अरूण विधाटे यांच्यात लढत झाली. याठिकाणी एकूण 818 मतदानापैकी 474 मतदान झाले. तर नोटाला 9 झाले. त्यापैकी किरण विधाटे यांना 225 मते पडली. तर मोहनदास विधाटे यांना 240 मते पडली. ते 15 मतांनी निवडून आले.

वॉर्ड क्रमांक दोनमध्ये भाजपचे दगडू शिवराम केदार व राष्ट्रावादीचे रावसाहेब नाना बर्डे यांच्यात लढत झाली. या ठिकाणी एकूण 740 पैकी 454 मतदान झाले. तर नोटाला 2 झाले. त्यापैकी रावसाहेब बर्डे यांना 172 मते पडली. तर दगडू केदार यांना 280 मते पडली. ते 108 मतांनी निवडून आले.

राहुरी खुर्द ग्रामपंचायत येथील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादी प्रणित जनसेवा मंडळाच्या सौ. अश्विनी सुनील कुमावत व भाजप प्रणित बुवासाहेब ग्रामविकास मंडळाच्या सौ. दिलशाद निसार शेख यांच्यात लढत झाली. या ठिकाणी 1 हजार 148 पैकी 872 मतदान झाले. तर नोटाला 10 झाले. त्यापैकी सौ. दिलशाद शेख यांना 409 तर सौ. अश्विनी कुमावत यांना 453 मते पडली. सौ. अश्विनी कुमावत यांचा 44 मतांनी विजय झाला.

आरडगाव ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी गटाचा धोबीपछाड करत वंचित बहुजन आघाडीने आपला झेंडा फडकावला आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे बाळासाहेब मनोहर म्हसे व वंचित बहुजन आघाडीचे सागर वसंत देशमुख यांच्यात लढत झाली. याठिकाणी 896 पैकी 704 मतदान झाले. तर नोटाला 8 झाले. त्यापैकी बाळासाहेब म्हसे यांना 254 मते पडली. तर सागर देशमुख यांना 442 मते पडली. यामध्ये सागर देशमुख यांचा 188 मतांनी विजय झाला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *