Thursday, April 25, 2024
Homeनगरलोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी

लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

मार्च महिन्यातील कापलेले उर्वरित वेतन गणेशोत्सव सणापूर्वी करण्याचे आदेश वित्त विभागाने दिल्याने लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्य आणि अधिकारी- कर्मचार्‍यांच्या दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

‘करोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधिमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करून त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. तसंच, चतुर्थश्रेणीतील कर्मचार्‍यांव्यतिरिक्त अन्य सर्व सरकारी कर्मचार्‍यांचा पगार कापण्यात येणार आहे.

राज्यातील ‘अ’ आणि ’ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली होती. ‘क’ वर्गाच्या कर्मचार्‍यांना 75 टक्के वेतन देण्यात आले होते. पण आता उर्वरित पगार देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जुलै महिन्याचा पगार ऑगस्टमध्ये होईल. त्यानंतर तर मार्चमध्ये राहिलेल्या दुसर्‍या टप्प्याची ही रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम गणेशोत्सवापूर्वी कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा होईल, याचा दक्षता घ्यावी, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. सरकारी कर्मचार्‍यांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यांनीही आपल्या कर्मचार्‍यांचे मार्चचे दुसर्‍या टप्प्यातील वेतन द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.

सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन सेवार्थ प्रणालीद्वारे देण्यात येते. सध्या जुलै महिन्याचे वेतन देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तांत्रिक गोष्टी लक्षात घेता दोन्ही वेतन आता एकत्र दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रथम जुलै महिन्याचे वेतन दिले जावे व त्यानंतर मार्च महिन्याच्या दुसर्‍या टप्प्यातील वेतन या प्रणालीद्वारे दिले जावे, मात्र ही प्रक्रिया गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या