Thursday, April 25, 2024
Homeनगरशासकीय कार्यालयाच्या सर्व तक्रारी आता आपलं सरकार पोर्टलवरच

शासकीय कार्यालयाच्या सर्व तक्रारी आता आपलं सरकार पोर्टलवरच

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी या आता केवळ आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीवरच कराव्या लागणार आहेत. तर लेखी स्वरूपात केलेल्या तक्रारी संबंधीत विभाग तसेच कार्यालयांना आपले सरकार प्रणालीवर अपलोड करावल्या लागणार आहेत. शासनाच्या अधिनस्त कार्यालयांकडे प्राप्त होणार्‍या तक्रारी या आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीमार्फतच स्विकारण्याबाबत परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.

- Advertisement -

या पारिपत्रकात म्हटले आहे की.राज्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारीचे ऑनलाईन पध्दतीने एकाच ठिकाणी निवारण करून घेता यावे, यासाठी आपले सरकार ही तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागांबरोबरच राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली होती. मात्र बहुतांश तक्रारी या आपले सरकार तक्रार प्रणालीवर नागरिकांकडून करण्यात येत नव्हत्या. आता नागरिकांकडून प्राप्त होणार्‍या सर्व तक्रारी या आपले सरकार तक्रार प्रणालीमार्फत ऑनलाईन स्वरुपातच स्विकारण्यात याव्यात.

तसेच मंत्रालयीन विभागाकडे, शासकीय प्राधिकारणाकडे, अधिनस्त कार्यालयांकडे यापूर्वी तसेच यानंतर ऑफलाईन स्वरुपात प्राप्त झालेल्या तसेच होणार्‍या तक्रारींचा समावेश आपले सरकार तक्रार प्रणालीमध्ये ऑनलाईन स्वरुपात सदर तक्रारीची पोहच देणार्‍या कार्यालयाने करावा आणि सदर तक्रार निवारणासाठी संबंधितांकडे ऑनलाईन स्वरुपात पाठवावी, जेणेकरुन तक्रारदारांना सदर तक्रारीचा ऑनलाईन पाठपुरावा करता येईल.

समक्ष लेखी तक्रार दाखल करणार्‍या तक्रारदाराचा मोबाईल नंबर तक्रार अर्जावर नमूद करण्याची विनंती करण्यात यावी जेणेकरून तक्रार प्राप्त झाल्याबाबतचा लघु संदेश त्याला पाठविता येईल. ज्या कार्यालयांनी स्वत:ची तक्रार निवारण कार्यप्रणाली विकसित केली असेल. त्यांनी ही कार्यप्रणाली आपले सरकार तक्रार निवारण कार्यप्रणालीशी संलग्न करावी.

आपले सरकार तक्रार प्रणालीवर 1 डिसेंबर, 2022 रोजी प्रलंबित असलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावा. या सूचनाचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता सर्व विभागांनी व त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयांनी घ्यावी.असे या परिपत्रकात म्हटले आहे. हे परिपत्रक राज्यपाल यांच्या आदेशानुसार राज्याचे अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी पारित केले आहे.

शासकीय कार्यालयांत जनतेची पिळवणूक होत होती.तक्रार केल्यावर दखल घेतली जात नव्हती अनेकवेळा तक्रारी कचर्‍याच्या पेटीत टाकल्या जात होत्या. आता कार्यालयात आलेली तक्रार ऑनलाईन स्वरूपात आपले सरकार पोर्टलवर घेतली जाणार आहे. तसेच त्याचा निपटारा होणार आहे. त्याचा पाठपुरावा ऑनलाईन करता येणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत.

– भाऊसाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते.

- Advertisment -

ताज्या बातम्या