Friday, April 26, 2024
Homeनगरशासकीय मका हमी भाव केंद्र बंद, व्यापारी सरसावले

शासकीय मका हमी भाव केंद्र बंद, व्यापारी सरसावले

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुका खरीप हंगामातील मका पिकाच्या क्षेत्रात अग्रेसर होत असून किमान हक्काचा बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी मका पिकांकडे वळले.

- Advertisement -

मात्र यंदा खुल्या बाजारात अवघा 1400 रुपये क्विंटल भावाने आडतदार मका खरेदी करत असल्याने आणि त्यातच सरकारचे हमी भाव केंद्र ज्या दिवशी तालुक्यात सुरू झाले त्याच दिवशी राज्य सरकारचे मका खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याने पुन्हा वाढीव मुदत अजून मिळली नसल्याने सरकारच्या हमी भाव केंद्रांवर मका खरेदी सुरूच झाली नाही.

मागील वर्षभरात खुल्या बाजारात मक्याचे बाजारभाव 1300 रुपयांपासून 1400 रुपये क्विंटल होते. केंद्र सरकारने मका पिकाला हमी भाव 1850 रुपये जाहीर केल्याने शेतकर्‍यांनी मका लागवड केली आणि ही मका आता बाजरात विक्रीसाठी येत आहे. मात्र मकाची शासनाची आधारभूत किंमत 1850 रुपये प्रति क्विंटल असताना श्रीगोंद्यात मात्र ही मका 1300 ते 1400 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जात आहे.

दर घसरल्याने राज्यात मका उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आधारभूत किंमत देऊन मका खरेदी केंद्र सुरू केले होते.मक्याची आधारभूत किंमत जाहीर करून शासन मका खरेदी करीत असते. मात्र श्रीगोंद्यात शासनाचे मका खरेदी केंद्र सुरू झाले. त्याच दिवशी सरकारचे खरेदी उद्दिष्ट संपले.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका दर हमी भावापेक्षा कमी आहे तर यात शेतकर्‍यांचा माल पाहून बाजारभाव कमी जास्त होत आहेत. शेतकर्‍यांना किमान अपेक्षित दर मिळत नाही. याबाबत तक्रार कुठे करायची यापेक्षा आहे त्या बाजारभावाला माल विकण्यात येत आहे. खुल्या बाजारापेक्षा शासनाच्या आधारभूत योजनेत दोन पैसे जादा मिळतील ही अपेक्षा असताना अजून मका खरेदी केंद्र सुरू नाही. तर ग्रामीण भागात थेट शेतकर्‍यांच्या दारात जाऊन मका खरेदी केली जात आहे. 1300 रुपये क्विंटलने शेतकर्‍यांना मका विकावी लागत आहे.

बाजार नेमके पाडले कुणी?

श्रीगोंद्यात मका बाजारभाव आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे. शेतकर्‍यांना मात्र अपेक्षित दर मिळत नाही. किमान उत्पादन खर्च वसूल होऊन चार पैसे मिळतील या अपेक्षेने शेतकरी शेतात राबत आहेत. मात्र बाजारभाव योग्य मिळत नसल्याने शेतकर्‍यांचा झालेला खर्चसुद्धा वसूल होत नसताना किमान हमी भावाने खरेदी व्हावी. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची असहायता पाहून मका कमी दराने विकावी लागत असल्याने हे बाजारभाव नेमके पडले कसे हा प्रश्न आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या