Saturday, April 27, 2024
Homeजळगावशासन हमीदर खरेदी केंद्र बंद !

शासन हमीदर खरेदी केंद्र बंद !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयात शासनाची हमीदर खरेदी केंद्रांवर शेतमालाची खरेदी होईल, यासाठी हजारो शेतकरी प्रतीक्षेत असताना अवघ्या दीड महिन्यातच शासकीय खरेदी केंद्रांवरील मका, ज्वारी आणि बाजरीसह उडीद, मूग खरेदी बंद करण्यात आली आहेे.

जिल्हयात मका, ज्वारी, बाजरी आदी शेतमालाची सर्वच केन्द्रांवर शासन हमीदर खरेदी बंद करण्यात आली असून दोन दिवसांपासून ऑनलाईन नोंदणीसाठी वेबसाईट देखिल बंद करण्यात आली आहे. आतापर्यत 10हजार, 897 मका, ज्वारी, बाजरीसाठी 10897 शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी केवळ 2498 शेतकर्‍यांच्या 78हजार 509.50 क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात आली आहे.

- Advertisement -

गजानन मगरे. जिल्हा विपणन अधिकारी.

शिवाय पोर्टल देखिल बंद करण्यात आले आहे. त्यामुळे, ज्या शेतकर्‍यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे, त्यांचाही मका, ज्वारी, बाजरी खरेदी होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

या संदर्भात शासनाचे खरेदी उद्दीष्टपूर्ती पूर्ण झाल्याने गुरूवार दि. 17 डिसेंबरपासूनच भरडधान्य हमीदर खरेदी केंन्द्रांवर धान्याची खरेदी बंद करण्यात आली असल्याचे जिल्हा सुत्रांनी सांगीतले.

शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होताच कुलूप

केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेंतर्गत जिल्ह्यातील 15 तालुक्यांत मार्केटिंग फेडरेशनतर्फे आदीवासी भागासह 17 शासन हमीदर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. या खरेदी केंद्रांवर हमीभावाने मका, ज्वारी, बाजरीची खरेदी करण्यात येत होती.

यासाठी शेतकर्‍यांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक होते. जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रांवर नाव नोंदणी केलेली असतानाच गुरूवारपासून मका, ज्वारी, बाजरी खरेदीचे पार्टल बंद करण्यात आले आहे. यामुळे शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर माल विक्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नोंदणी झालेल्या व शासन हमीदर खरेदी केन्द्रांच्या प्रतिक्षेत असणार्‍या शेतकर्‍यांना खुल्या बाजारात व्यापार्‍यांना मिळेल त्या दरात मका, ज्वारी, बाजरी विक्रीशिवाय पर्याय राहिला नाही. दिड पावणेदोन महिन्यातच शासन हमीदर खरेदी केन्द्र बंद करण्यात आल्याने नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचा शेतमाल अजूनही बर्‍याच प्रमाणात शिल्लक आहे. शिवाय शासनाचे पोर्टल अचानकरित्या बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील मका, ज्वारी, बाजरी उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

आता शेतमाल विक्रीची चिंता

शासनाकडून शेतमाल हमीदर खरेदीकेंद्र दरवर्षी खरीप हंगामानंतर आठ ते दहा दिवसांत सुरु होतात. ती जानेवारी अखेरपर्यंत तरी सुरु राहतात परंतू यंदा तब्बल एक महिना उशिराने जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येवून अवघ्या दिड महिन्यातच शासनाचे दिलेले उद्दिष्ट पुर्ण झाले म्हणून ही केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.शासकिय हमीदराने शेतमाल खरेदीचे उद्दीष्ठपूर्ती झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या