Wednesday, April 24, 2024
Homeनगरगोणेगाव येथे वीज वितरण कर्मचार्‍यांना धक्काबुक्की

गोणेगाव येथे वीज वितरण कर्मचार्‍यांना धक्काबुक्की

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील करजगाव येथे वीज वितरणच्यावतीने मिटर तपासणीवेळी आकडे टाकून वीज चोरी करताना आढळून आलेल्या ग्राहकास अधिकृत परवाना घेवून वीज घ्या असे सांगितल्याचा राग आल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत वीज वितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ हरिभाऊ भाऊसाहेब येळे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, आमच्या एमएसईबी मार्फत चोरुन वीज वापरणारे व बोगस आकडे टाकून वीज वापरणार्‍या लोकांविरुद्ध धडक मोहीम चालू आहे. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास गोणेगाव येथे बोगस वीज जोडणी व आकडे टाकून चोरुन वज वापरणार्‍या लोकांविरुद्ध कारवाई करण्याकामी आमच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वरिष्ठ तंत्रज्ञ शिवकुमार नारायण आचारी, सचिन बाबुराव डाके, नितीन पोपट जाधव, संदेश शिवाजी कसबे, अभिजीत भाऊसाहेब भाकरे, सिमोन फिलीप साळवे व सयाजी लक्ष्मण फोडसे असे गेलो असता गोणेगाव येथे गावातील सर्व मीटर चेक करुन आम्ही आंबादास दत्ताय रोडे याचे घरी वीज मीटर चेक करत असताना त्याच्या घरात वीज मीटर मिळून आले नाही.

त्याने त्याच्या घराजवळ असलेल्या विजेच्या खांबावर आकडा टाकून वीज वापरताना मिळून आला. तेव्हा त्यास अधिकृत रित्या वीज जोडणी करुन घ्या असे सांगितले असता त्याचा राग येवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचे मोबाईलमध्ये शुटींग करत असताना त्याने मला शिवीगाळ करुन गचांडी धरुन माझा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला व धक्काबुक्की केली. त्याच्या पत्नीनेही शिवीगाळ केली.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी अंबादास दत्तात्रय रोडे व त्याची पत्नी रा. करजगाव ता. नेवासा या दोघांवर भारतीय दंड विधान कलम 353, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या