Thursday, April 25, 2024
Homeनगरगोंडेगाव-उंदिरगाव रस्त्यावरील पूल मृत्यूचा सापळा

गोंडेगाव-उंदिरगाव रस्त्यावरील पूल मृत्यूचा सापळा

गोंडेगांव |वार्ताहर| Gondegav

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव-उंदीरगाव इजीमा 223 रस्त्यासाठी असणारा पूल मोडकळीस आलेला असून हा पूल अक्षरशः मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. सबंधित विभाग यांनी लक्ष दिले; परंतु हा पूल वाहतुकीस योग्य नाही असे ग्रामपंचायातला लेखी स्वरुपात कळविले आहे. हा पूल कधी दुरुस्त करणार? हा पूल पडून मोठी दुर्घटना घडण्याची वाट पहाणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. यासाठी येथून पर्यायी मार्ग तयार करून हा पूल तातडीने दुरुस्त करावा,अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहे.

- Advertisement -

गोंडेगांव गावतळ्या शेजारी श्रीरामपूर- पुणतांबा रोडवरील गोंडेगांव-उंदीरगांव चौफुली असणारा पूलावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ चालू असते. या उंदीरगांव रोडच्या भागात गावातील सर्वात मोठ्या वाड्यावस्त्यांवर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने या ठिकाणावरून गावात दैनंदिन दळणवळण होत असते. या रस्त्यावरून दूध उत्पादक शेतकरी, शालेय विद्यार्थी, नागरिक, काही प्रमाणात कांदा उत्पादक, ऊस उत्पादक इतर भुसार मालाची जडवाहतूक होत असते.

सदर ठिकाणी गावतळे असून समांतर पाणी भरल्यानंतर एका बाजूची भिंत निखळून पडलेली आहे. तिचे अर्धे दगडे खाली पडलेले आहेत. यावेळेस गावतळ्यात पाणी भरल्यानंतर राहिलेले अर्धे दगड खाली पडतील व पुलाचा स्लॅब जमीन दोस्त होईल. खाली 15 फूट खोल पाणी असल्याने पर्यायी व्यवस्था होणार नाही. अनेकवेळा पंचायत समितीकडे विनंती करूनही या कामाकडे दुर्लक्ष केलेले आहे. या ठिकाणी तत्कालीन सभापती वंदना मुरकुटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा अभियंत्यांना सल्ला दिला होता. स्ट्रक्चरल ऑडिट होऊन सुद्धा सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे यांनी याठिकाणी लक्ष दिले होते परंतु अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. पावसाळ्यानंतर या ठिकाणाहून जाण्यासाठी पर्यायी मार्ग होणार नाही. अशावेळी सहा महिने त्या बाजूची वाहतूक बंद राहणार आहे. संबंधित अधिकार्‍यांना नागरिकांनी संपर्क केला असता पैसे मंजूर झालेले आहेत; परंतु प्रत्यक्ष कामास केव्हा सुरुवात होणार की पूल पडल्यावर होणार? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. सदर रोडवर भुसार व्यापारी असून त्याठिकाणी एक वेब ब्रिज असून या पुलावरून जड वाहनांची वाहतूक होत आहे. पावसाळ्यात हा पूल खचणारच आहे, तरी त्वरित पुलाची दुरुस्ती करावी, अशी या भागातील नागरिक मागणी करीत आहेत.

ग्रामपंचायतमार्फत पंचायत समितीकडे लेखी स्वरूपात या पुलाकरिता पाठपुरावा केलेला असून पूल कोणत्याहीक्षणी पडू शकतो व मोठी दुर्घटना घडू शकते. गावतळ्यात पाणी आल्यास पर्यायी मार्ग बनवता येणार नाही. सदर पुलास पर्यायी पूल त्वरीत करण्यात यावा.

– सागर बढे, सरपंच गोंडेगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या