Wednesday, April 24, 2024
Homeनगरसोने खरेदीकरत ऑनलाईन पेमेंटचा फेक मेसेज पाठविला

सोने खरेदीकरत ऑनलाईन पेमेंटचा फेक मेसेज पाठविला

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

कायनेटी चौकातील शुगुन ज्वेलर्समधून सोन्याचे दागिणे खरेदी करून ऑनलाईन पेमेंट केल्याबाबत फेक मेसेज पाठवून फसवणूक करणार्‍या तिघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. भाविक धर्मेश पडीयार (वय 23), अपूर्व जयेशभाई गोहील (वय 24, दोघे रा. वर्धमान नगर, मालाड पश्चिम, मुंबई), मोहित हरिकिसन सिंग राजपुत (वय 24 रा. नरोडा, जि. अहमदाबाद, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सात ग्रॅम सोन्याचे कॉईन, बाळी असा 42 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

- Advertisement -

8 जून, 2022 रोजी दुपारी सुनील गंगाधर डहाळे (वय 52) यांच्या शुगुन ज्वेलर्स येथे एक 25 वर्ष वयाचा अनोळखी तरूण आला व त्याने सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहे, असे सांगून पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन, दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन व 0.760 ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील बाळी असे दागिने खरेदी केले. दागिणे खरेदीचे 42 हजार रूपये ऑनलाईन पाठवतो, असे सांगून डहाळे यांच्या पत्नीचा मोबाइल नंबरवर ऑनलाईन पेमेंट झाले, असे सांगितले.

डहाळे यांनी त्यांच्या पत्नीस पेमेंट आले का असे विचारले असता पेमेंटचा मेसेज आला आहे असे त्यांनी सांगितले. तेवढ्यात सदर इसम हा दुकानाच्या बाहेर जात असतांना डहाळे यांना संशय आल्याने त्यांनी पत्नीच्या मोबाईलवरून त्यांचे अकाऊंट चेक केले असता अकाऊंटमध्ये कोणत्याही प्रकारचे पेमेंट झाले नसल्याबाबत त्यांना खात्री झाल्याने त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी करून तांत्रिक तपासाच्याआधारे आरोपींची नावे निष्पन्न केली. उपनिरीक्षक महाजन यांच्या पथकातील अंमलदार याकुब सय्यद, हंडाळ, वाघ, भिंगारदिवे, सरोदे, अस्लम पठाण, तांबे यांनी तिघांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या