गोलाणी मार्केटने अनुभवला बाबासाहेबांचा चरण स्पर्श !

लालचंद अहिरे । प्रतिनिधी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (great man Dr. Babasaheb Ambedkar) त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करुन समाजातील प्रत्येक माणूस जागृत करण्याचे काम करीत होतेे. त्यात सन 1936 मध्ये जळगाव शहरातील पूर्वीचे कॉटन मार्केट (erstwhile cotton market) व आताचे गोलाणी मार्केट (Golani Market) येथे असेंबलीच्या निवडणुकीच्या (assembly election meeting) सभेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यानिमित्त जळगावातील राजवाड्यातील म्युन्सिपल कौन्सिलर शिवाजी सोनवणे यांच्या घरी बाबासाहेबांनी उडीदाची दाळ,ज्वारीची भाकरी, कांदा, पापड आणि आचार असा भोजनाचा आस्वाद घेतला होता. अशा आठवणींचा ठेवा जुन्या मंडळींकडून भीमसैनिकांना स्फूर्ती (Cheers to Bhimsainiks) देवून जातात आणि आजही मागे वळून पाहतांना इतिहासाच्या पाऊल खुणा जपत 14 एप्रिल रोजी जयंती दिनी लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होतात. यंदाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरासह परिसरात बाबासाहेबांनी त्यावेळी दिलेल्या भेटींच्या आठवणींना दिलेला उजाळा.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एका समग्र मानव जातीच्या कल्याणाचं नाव आहे. डॉ. आंबेडकर या महामानवाने अनेक बदल, परिवर्तन आणि प्रबोधन घडवून आणून आपलं नाव अनेकांच्या काळजात कोरलं आहे. असे म्हणतात की, परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे अगदी त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य ज्यांनी ज्यांनी अंगिकारले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या कृतीत उतरविले, स्वीकारले, मान्य केले त्यांच्या जीवनाचे सोनेच झालेले आपणाला दिसून येते. इथल्या माणसाला चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे प्राण्यापेक्षाही हीन वागणूक मिळत असे. म्हणजेच ज्यांचे जगणे मृतप्राय करून टाकलेले होते. अशानाही माणूसपण मिळवून देण्यासाठी, चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या जोखडातून, गुलामगिरीच्या आणि शोषणाच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी स्वतःच्या जीवाची, घराची, संसाराची एवढेच काय तर मुलाबाळांचीही पर्वा न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतुलनीय कार्य केले आहे. विषमता, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सत्याग्रह व संघर्ष करावा लागला आहे. त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागला आहे. त्यामुळेच आता अनेकांचे जीवन माणूसपणाचे आणि स्वाभिमानाचे झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सभा, संमेलन, आंदोलन, मोर्चे, लढे अशा माध्यमातून समाज जागृती केली जात होती. अशीच एक सभा बाबासाहेबांची 8 ऑक्टोबर 1936 रोजी चळवळीतील कार्यकर्त्यांनी लावली होती. ही सभा त्यावेळेचे कॉटन मार्केट आताचे गोलाणी मार्केट जळगाव येथे ही सभा असेंबलीच्या निवडणुकीसाठी आयोजित केली होती. सभा संपल्यानंतर जळगावातील राजवाडा व आताचे आंबेडकर नगरात आले होते. त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधला. प्रत्येक घराघरात फिरले. समाजाला संदेश दिला की, एकवेळ उपाशी रहा; पण मुलांना शिक्षण द्या. त्यात थोडेही कमी पडू देऊ नका. असा प्रत्येकाशी संवाद बाबासाहेबांनी साधला होता. त्यादिवशी राजवाड्यातील वरिष्ठ कार्यकर्ते तथा म्युन्सिपल कौन्सिलर शिवाजी तुकाराम सोनवणे यांच्या घरी बाबासाहेबांनी जेवण केले.

जेवणामध्ये उडीदाची दाळ, ज्वारीची भाकरी, कांदा, पापड व आचार हे होते. हे त्या काळात मोठे जेवण समजले जात होते. बाबासाहेबांच्या भेटीमुळे प्रत्येकाच्या मनामध्ये चैतन्य निर्माण झाले होते. तसेच जळगाव येथे त्या वेळचे नगरपालिकेचे अध्यक्ष अ‍ॅड. भा. वि. प्रधान यांचे घरी बाबासाहेब मुक्कामी राहिले होते. यावेळी अ‍ॅड. भा. वि. प्रधान, भास्करराव बनसोडे यांच्यासह चळवळीत सक्रीय कार्यकर्त्यांचा गोतावळा बाबासाहेबांच्या भेटीला होता. तसेच एका मर्डर खटल्याच्या कामानिमित्त बाबासाहेब जळगावात आले होते.

त्यावेळी चित्रा चौकाजवळील व गुजरात स्वीट स्मार्ट समोरील जळगाव सेशन कोर्टात त्यांनी केस चालविल्याची नोंद आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 1952 ला भुसावळ व चाळीसगाव येथे सभा आयोजित केली होती. धनजी रामचंद्र बिर्‍हाडे, सेनू नारायण मेढे, शामराव कामाजी जाधव, दिनबंधू दिवाण चव्हाण, गिरीश माधव निकम आदी मुख्य कार्यकर्ते नियोजन करत असत

. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बॉडीगार्ड म्हणून अण्णासाहेब लळिंगकर धुळे आणि नथ्थुबुवा सपकाळे पहिलवान कडगाव हे सावलीसारखे बाबासाहेबांच्या सोबतच असत. जळगाव जिल्ह्यासह खान्देशात देखील बाबासाहेबांच्या सभानिमित्त भेटीचे प्रसंग आजही ऐतिहासिक आठवणींना उजाळा देत आहेत. 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महामानवास त्रिवाद अभिवादन.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *