टपर्‍यांचे साचे मोठ्या प्रमाणावर टाकल्याने गोंधवणी रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातून वैजापूर-श्रीरामपूर हा राज्यमार्ग जात असून हा महामार्ग सध्या कोणत्या न कोणत्या कारणामुळे अपूर्णावस्थेत राहिला आहे.

त्यात गोंधवणीपासून ते झिरंगे पेट्रोलपंपापर्यंतचा रस्त्याचा बहुतांश भाग हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. राजकीय पदाधिकार्‍यानेच अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्यामुळे अन्य लोक बिनधास्तपणे अतिक्रमण करत आहे. त्यामुळे हा रस्ता काही दिवसात एकच वाहन जावू शकेल असा रस्ता शिल्लक राहतो की नाही याबाबत शंकाच आहे. राजकीय दबावामुळे मोकळा श्वास घेता येत नसल्यामुळे या रस्त्याला घरघर लागली आहे.

श्रीरामपूर-वैजापूर हा राज्य महामार्ग चार पदरी मंजूर झाला असून मात्र या रस्त्यावर कायमच काही ना काही संकट ओढवले जात आहे. काही ठिकाणी बांधकाम विभाग व शेतकर्‍यांचे वाद आहेत तर काही ठिकाणी बांधकामविभागाकडून रस्त्याचे कामच होत नाही. श्रीरामपूर शहरातून जाणारा हा रस्ता शहराचे वैभव ठरणारा होता.

मात्र काही वर्षापासून या रस्त्यावर हळूहळू अतिक्रमण वाढत चालले. छोटेछोटे टपरीवाल्यांचे पूनर्वसन करुन त्यांना तेथे दुकाने उभारुन देण्यात आले. मात्र ही दुकाने खूपच पुढे आल्यामुळे रस्त्याची रुंदी आपोआपच कमी झाली आहे. पुढे या रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांचा पुढचा भाग वाढत गेल्यामुळे हा रस्ता अधिकच अरुंद झाला आहे.

एवढेच नव्हे तर या ठिकाणी पोलीस चौकी असल्याचे सांगून जागा धरुन तेथे दोन दुकाने तयार केली. त्यानंतर हळूहळू जागा धरुन त्या ठिकाणी लोखंडी पाईप टाकून दुकानांचे साचे तयार करुन आपली दुकाने थाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

डावखर लॉन्सपासून ते झिरंगे पेट्रोलपंपापर्यंतचा रस्ता अतिक्रमणाचा विळख्यात सापडला आहे. अतिक्रमण करणारे हे राजकीय दबाव टाकून आपली दुकाने थाटून अतिक्रमण करत आहेत. राजकीय दबावापुढे अतिक्रमण करणार्‍यांना कोणीच काहीच बोलत नाहीत. सगळेजण घाबरुन शांतपणे अतिक्रमणाचे चित्र पहात आहेत.

गोंधवणी येथील महादेव मंदिराच्या प्रवेशद्वार कमानीशेजारीच दुकाने थाटली जाणार आहेत. या ठिकाणी महादेवाची मूर्ती व जटातून गंगा वाहताना पिंड उभारुन गंगा अवतरल्याचे एक सर्कल तयार करुन मोठा चौक उभारला जाणार होता. हे सर्कल म्हणजे गोंधवणीच्या वैभवात भर घालणारा असा होता. यासाठी स्व. जयंतराव ससाणे यांनी 10 ते 15 लाखाचा निधी मंजूरही करुन आणला होता. त्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही निधी दिला होता. तरीही अतिक्रमणाच्या विळख्यात सर्कलची जागा हरवली गेली आहे.

वॉटर सप्लायच्या जागेतही दुकानांचे साचे तयार करुन पडले आहेत. दुकाने तयार करुन ते विकण्याचा सपाटा लावला जाणार आहे. मोठा आर्थिक घोडेबाजार होण्याची भिती आहे. याबाबत नगरपालिकेकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत मात्र राजकीय दबावापुढे या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे झाकला जाणार आहे.स्थानिक नगरसेवकांनीही गुपचिळीचे धोरण स्विकारले आहे. भविष्यात ही अतिक्रमणे काढणे खूपच अवघड होवून बसणार आहे. यामुळे या अतिक्रमणांना पालिकेने आताच आवर घातला गेला नाही तर लोकांच्या नाराजीस सामोेरे जावे लागणार आहे.

याबाबत मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना विचारले असता गोंधवणीच्या अतिक्रमणाबाबत तुमच्याकडे फोटो आहेत का? ते पाठवून द्या. काल सकाळी फोटो पाठवूनही दिवसभर त्यांना ते फोटो पहाता आले नाही. संपूर्ण गोंधवणी रस्त्यावरील अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न असताना तसेच वॉटर सप्लायच्या भागातही अतिक्रमण केलेले असतानाही मुख्याधिकार्‍यांनी फोटो मागविले हे विशेष. त्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी कर्मचारी आहेत. त्यांचे नेहमीच या भागात येणे जाणे असते. तरी या अतिक्रमणाकडे न पहाता डोळे झाकून ये-जा करतात की काय? तसेच गोंधवणी येथून तक्रारी गेलेल्या असताना प्रत्यक्ष जावून पहाणी करण्याऐवजी फोटो मागविणारे मुख्याधिकारी या अतिक्रमणाबाबत कारवाई कधी करणार याबाबत साशंकताच आहे.

जो तो ज्याच्या त्याच्या पध्दतीने काम करत आहे. ज्याला वाटेल तो तिथे जागा धरुन अतिक्रमण करत आहे. यात नगरपालिका शांत का? या सर्कलसाठी मी 10 लाख रुपयाचा निधीही आणला होता. अपघात होवू नये म्हणून या रस्त्यावर डिव्हाडर टाकले. या चौकापासून या रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसविले होते. आता मात्र हा रस्ता खूपच अरुंद झाला आहे. याबाबत नगरपालिकेने लक्ष घालून अशी अतिक्रमणे काढणे गरजेचे होते. ती जबाबदारी नगरपालिकेची आहे. मग पालिकेने अतिक्रमण काढण्याबाबत गप्प बसण्याचे धोरण का स्विकारले आहे.

– भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *