Thursday, April 25, 2024
Homeनगरगोदावरी दुथडी !

गोदावरी दुथडी !

अस्तगाव (वार्ताहर)

नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल सकाळी धुव्वाधार पाऊस झाला. काल सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत तब्बल ११५ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्ण क्षमतेने भरलेल्या या धरणातून ८१२९ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. नाशिक परिसर आणि नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या परिसरातील पावसाने पाणी आल्याने या बंधाऱ्यातून गोदावरीत काल सायंकाळी ६ वाजता ३२६२९ क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. त्यामुळे गोदावरी पुन्हा दुथडी भरून वाहू लागली आहे.

- Advertisement -

दारणाचा विसर्गही ५५० वरून २७०८ क्युसेक करण्यात आला आहे. गंगापूर समुहातील गौतमी गोदावरी हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे या धरणातूनही ७५० क्युसेकने विसर्ग गंगापूरच्या दिशेने सुरू होता.

काल सकाळी सहा पासून गंगापूरच्या पाणलोटात धुव्वाधार पावसाचे आगमन झाले. पुढील सहा तासांत १२ वाजे पर्यंत ११५ मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबकला ४३, अंबोलील ७९ मिमी पावसाची नोंद झाली. पावसात मोठा जोर असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक गंगापूर धरणात होण्यास सुरुवात झाली. यामुळे काल सकाळी ६ ते सायंकाळी ५ पर्यंत या धरणात १९८ दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले. पूर्ण क्षमतेने हे धरण भरलेले असल्याने व पाण्याची आवक पाहाता सकाळी ११०६ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी ३ वाजता हा विसर्ग ८१२९ क्युसेक इतका करण्यात आला. हा विसर्ग रात्री उशीरा पर्यंत टिकून होता. गंगापूर समुहातील गौतमी गोदावरी या धरणाच्या भिंतीजवळ ८५ मिमी पावसाची नोंद झाली. दिवसभरात त्यात ६४ दलघफू नवीन पाणी दाखल झाले. हे धरण पूर्ण क्षमतेने भरुन त्यातून ७५० क्युसेकने विसर्ग गंगापूर च्या दिशेने सुरु आहे. काश्यपीला दिवसभरात ९२ मिमी पावसाची नोंद झाली. हे धरण ९५.०३ टक्के भरले होते. त्यात रात्रीतून वाढ होईल. या तूनही पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग होऊ शकतो. काश्यपीत ११ तासांत १४२ दलघफू नवीन पाणी दाखल झाले. गंगापूर मधून ८१२९ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. नाशिक परिसरात ही जोरदार पाऊस झाला. तसेच नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या पाणलोटातील ओढे नाले भरुन वाहु लागल्याने बंधाऱ्यात पाण्याची आवक वाढली. तसेच होळकर पूला जवळ ११ हजार क्युसेकने पाण्याची आवक होत होती. त्यामुळे मोठी आवक होत असल्याने सुरुवातीला २०० क्युसेक असणारा गोदावरीतील विसर्ग हळुहळु वाढत गेला. दारणातूनही २७०० क्युसेक, वालदेवीतून १८३ क्युसेक, कडवातून ४२४ क्युसेक विसर्ग नांदूरमधमेश्वर च्या दिशेने सुरु आहे.

दारणाच्या पाणलोटात काल दिवसभरात ५ मिमी पावसाची नोंद झाली. तर भावलीला ४० मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर पावसाचे आगमन झाल्याने ५५० क्युसेकने सुरु असलेला दारणाचा विसर्ग काल सकाळी ९ वाजता ८०० क्युसेक करण्यात आला. त्यानंतर तो वाढवत दुपारी ३ वाजता २७०८ क्युसेक इतका करण्यात आला.

गंगापूर समुह तसेच दारणा समुह व अन्य ठिकाणचे पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात दाखल होत असल्याने जायकवाडीच्या दिशेने या बंधाऱ्यातून गोदावरीत सकाळी सुरुव ातीला २०० क्युसेक, नंतर वाढवत दुपारी ३ वाजता ३१५५ क्युसेक, तासाभरात ४ वाजता ८७३१ क्युसेक, ५ वाजता १४२३४ क्युसेक तर सायंकाळी ६ वाजता ३२६२९ क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. यासाठी नांदूरमधमेश्वरचे पाचही दरवाजा वर करण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहु लागली आहे.

जायकवाडी ७५ टक्के!

काल जायकवाडी जलाशयात सायंकाळी ६ वाजता १३७९३ क्युसेक ने नवीन पाणी दाखल होत होते. उपयुक्तसाठा ५७.२० टीएमसी इतका झाला होता. तर हा साठा ७४.६० टक्के इतका झाला होता. गोदावरीतून नव्याने दाखल होत असलेला विसर्ग उद्या सकाळ पर्यंत दाखल होईल. त्यामुळे अजुनही या जलाशयात पाणी साठा वाढणार आहे.

नगर जिल्ह्यात आजही यलो अलर्ट

२४ व २५ तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासोबतच आज कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. नगर, नाशिक आणि पुण्यासह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या