Wednesday, April 24, 2024
Homeनगरगोदावरी उजवा कालवा सल्लागार समितीची आज बैठक

गोदावरी उजवा कालवा सल्लागार समितीची आज बैठक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

सिंचनाच्या आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी गोदावरी उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक आज शनिवार दि. 7 नोव्हेंबर रोजी

- Advertisement -

दुपारी 2.30 वाजता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राहाता येथील इरिगेशन बंगल्यात आयोजित करण्यात आली आहे.

राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, कोपरगावचे आमदार अशुतोष काळे, निफाडचे आमदार दिलीप बनकर, श्रीरामपूरचे आमदार लहु कानडे यांचेसह गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, कोसाकाचे अध्यक्ष आदींंसह कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती जलसंपदाचे नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली.

दरम्यान या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे. 30 टीएमसी क्षमतेच्या दारणा तसेच गंगापूर धरण समुहात 26 टीएमसी पाणी आहे. यावर पिण्याच्या पाण्याचे, एक्सप्रेस कालव्याचे, सिंचनाचे आरक्षण वगळता किती पाणी उपलब्ध होऊ शकते यावर या बैठकीत खल होऊ शकतो.

यंदा पावसाळा चांगला असल्याने लाभक्षेत्रात 100 टक्के क्षेत्रावर रब्बीची पिके उभी राहू शकतात. निव्वळ कालव्यावर अवलंबून असलेले तसेच विहिरी तसेच विंधन विहिरी या चांगल्या सुरू होऊ शकतात मात्र सर्वच वीजपंप सुरू झाल्यानंतर विजेची कपात वाढणार आहे. त्यामुळे रोहित्रात बिघाड संभवतात.

त्यातच दुरुस्त होऊन रोहित्र लवकर मिळत नाही. शेतकरी पिके वाचविण्यासाठी पूर्णपणे कालव्यावर आवलंबून राहू शकतात. त्यामुळे जलसंपदा विभागाला काटेकोर नियोजन या हंगामात करावे लागणार आहे. रब्बीत 2 ते उन्हाळी 3 असे एकूण 5 आवर्तने मिळतील, असा शेतकरी अंदाज बांधत आहेत. मात्र प्रत्यक्षात किती आवर्तने मिळतात, हे आजच्या बैठकीत समजणार आहे.

वहन व्यय आणि पाणी चोरी कंट्रोल करून तसेच एक्सप्रेस आणि गोदावरीचे दोन्ही कालव्यांचे आवर्तन बरोबर घेतले तर पाणी बचत होऊ शकते. त्यातून आवर्तने चांगली होतात. आवर्तनावर चांगले नियंत्रण अधिकार्‍यांना ठेवावे लागणार आहे. पूर्वी दोन ते सव्वा दोन टिएमसीत एक आवर्तन होत असे आता हे आवर्तन पूर्ण क्षमतेने होण्यासाठी तीन ते चार टिएमसी पाण्याची गरज भासते.

मागील वर्षी आवर्तन केले पण वितरिकांना अडीच किमी अंतराची अट ठेवण्यात आली होती. पाण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्यास हे अंतर कमी कमी होत जाऊ शकते. ही भीती शेतकर्‍यांपुढे आहे. यासाठी सर्वच आवर्तनांचे नियोजन बारकाव्याने करण्याची गरज आहे. ही आवर्तने पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने उजव्या कालव्याला अधिकारी, कर्मचारी आहेत का? हा ही प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या