बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाला खावी लागली पोलीस स्टेशनची हवा

राहाता |वार्ताहर| Rahata

बोहल्यावर चढण्यापूर्वी प्रेयसीच्या तक्रारीवरून नवरदेवाला लग्नापूर्वीच मिरवणुकीतून पोलिसांनी कारवाईसाठी ताब्यात घेतल्याने वर्‍हाडी मंडळींची अचानक धांदल उडाल्याने लग्न मंडपात गोंधळ उडाला. अवघ्या काही मिनिटात शुभमंगल सावधान होणार तोच पोलिसांनी चालू मिरवणुकीतून नवरदेवाला पोलीस स्टेशनला नेले. त्याचवेळी वर्‍हाडी मंडळी मंगल कार्यालयात नवरदेव येण्याची वाट बघत होते तर लग्न लावण्यासाठी गुरु येऊन थांबले होते. परंतु बोहल्यावर चढण्या ऐवजी नवरदेवाला पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आली.

नाशिक येथील एका तरूणीने आमचे प्रेमसंबंध असून लग्नाचे आमिष दाखवून याने माझ्यावर अनेकदा अत्याचार केला व माझी फसवणूक केली असल्याची तक्रार राहाता पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलिसांनी चालू मिरवणुकीतून नवरदेवाला ताब्यात घेतले. नाशिक येथे राहणारा व राहाता येथील नववधूशी लग्न लावण्यासाठी आलेल्या नवरदेवा विरुद्ध नाशिकच्या उच्च शिक्षित 26 वर्षीय महिलेने तक्रार दिल्यानंतर मात्र नवरदेवाचा अवतारच गळून गेला होता. तक्रारीपूर्वी कलवरे कलवर्‍या यांच्या गराड्यात असणारा नवरदेव मात्र पोलीस स्टेशनला एकटाच दिसत होता डीजे समोर नाचणार्‍या वर्‍हाडींच्या डान्सला प्रतिसाद देत घोड्यावर बसून लग्नाची स्वप्न रंगवणार्‍या त्या नवरदेवाला पोलीस स्टेशनची हवा काही वेळ खावी लागली. शुभमंगल सावधान अर्थात अक्षदारुपी आशीर्वाद प्राप्त होण्यास अवघे काही मिनिटांचा अवधी असताना नवरदेवाच्या विरोधात नाशिक येथून आलेल्या 26 वर्षीय महिलेने राहाता पोलिसात तक्रार दिल्यानंतर नवरदेवाला पोलीसांनी ताब्यात घेतल्याची वार्ता मंगल कार्यालयात पसरतात वर्‍हाडी मंडळींमध्ये पसरताच एकच कुजबुज चर्चा व गोंधळ उडाला.

विवाहस्थळी काही अनर्थ नको म्हणून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली त्याचवेळी मात्र नवरदेवा कडून आलेल्या वर्‍हाडी मंडळीतील पाहुण्यांनी नको झंझट म्हणून मंगल कार्यालयातून काढता पाय घेत तेथून निघून जाणे पसंत केले तदनंतर लग्न जागेवर मोडले अन्यथा जर तक्रारदार महिला उशिरा आली असती व लग्न लागून गेले असते तर चूक नसलेल्या नववधूला आयुष्यभर मनस्ताप सोसण्याची वेळ आली असती याबाबतची सत्य घटना नववधूसह तिचे पालक व नातेवाईकांना समजताच लग्न मोडले गेले. परंतु म्हणतात ना आयुष्याची जोडी परमेश्वर ठरवित असतो योग आणि वेळ जुळून आल्याशिवाय लग्नाचा जोडा जमत नसतो.

नाशिक रोडच्या या नवरदेवाच्या बाबतीतील नाशिक प्रकरण समजल्यानंतर बरं झालं यां नववधूचे या वरा सोबत लग्न झाले नाही तसेच लग्न मोडले ते बरे झाले अशीच चर्चा होती चांगल्या मुलीच्या नशिबी असं का? व्हावं तसेच या नववधूच्या लग्नाचं आता काय ? होईल तिचे आयुष्य व भविष्य काय व कसे ? राहील याची चिंता वर्‍हाडी मंडळी नातेवाईक आप्तेष्ट व उपस्थित सर्वजण करीत होते तर दुसरीकडे सर्वजण तिच्या भावी आयुष्यासाठी व चांगल्या भवितव्यासाठी चांगला वर मिळो अशी प्रार्थना परमेश्वराकडे करीत होते.

दरम्यान, अध्यात्मिक संस्कार व उच्चशिक्षित अन् सुसंस्कृत असलेल्या या नववधूसाठी नातेवाईकांनी नात्यातीलच वर शोधला. शोधलेला नवरदेव मोठ्या मनाने पुढे आला व उपस्थित वराडी मंडळींच्या साक्षीने अक्षदारूपी आशीर्वादाने त्याच दिवशी काही तासातच या नववधूचे लग्न दुसर्‍या नवरदेवा सोबत लावून दिले. शेवटी परमेश्वराला काळजी राहते चांगल्याच्या पाठी परमेश्वर असतो व मदतीला धावून येतो अशीच चर्चा वर्‍हाडी मंडळी मध्ये या विवाह सोहळ्या दरम्यान होती.