Saturday, April 27, 2024
Homeनगरहैदराबादला जाण्याआधी तिघींपैकी एका मुलीवर नगरमध्ये अत्याचार

हैदराबादला जाण्याआधी तिघींपैकी एका मुलीवर नगरमध्ये अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तीन दिवसांपूर्वी नगर शहरातून तीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्या कुठे गेल्या? त्यांच्यासोबत काय घडले? आदी प्रश्न भेडसावत होते. या तीनही मुली हैदराबाद येथे सापडल्या. नगर शहरातून बेपत्ता होण्यापासून हैदराबादपर्यंतचा घटनाक्रम पाहता तो पालकांसह सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवणारा आहे. याप्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली असून या तीनपैकी एकीवर अत्याचार झाला असून अत्याचार करणार्‍या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. नगरच्या न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी, मंगळवार (दि.12) रोजी एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली शहरातून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. या तिघींच्या नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. तपास सुरू असतानाच पोलिसांना या मुली हैदराबादला त्यांच्या काकांकडे असल्याचे कळाले. मुलींना ताब्यात घेतल्यानंतर मात्र, जे समजले ते धक्कादायक होते. 12 सप्टेंबरला तिनही मुली शाळेत जात असल्याचे सांगून बाहेर पडल्या. परंतु त्या शाळेत न जाता मित्रांसोबत डोंगरगणला फिरायला गेल्या. फिरुन आल्यानंतर या मुली घरी न जाता सिद्धीबाग येथे थांबल्या. त्यावेळी मित्रांनी घरी जाण्याची विनंती करूनही त्या घरी गेल्याच नाहीत. घरी जायची भीती वाटते, आमची राहण्याची सोय करा असे त्यांनी मित्रांना सांगितले. त्यावर संबंधीत मित्रांनी त्यांना ते शक्य नसून आपल्या घरी जाण्यास सांगितले.

यादरम्यान आरोपी सोमनाथ उर्फ ऋषिकेश एकनाथ हापसे (रा. उंबरे, ता. राहुरी) हा कारमधून तेथे आला. मी चाइल्ड लाइनचे काम करतो, असे सांगून यातील पिडीत मुलींना तो राहत असलेल्या बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागातील भाडोत्री खोलीत घेऊन गेला. त्यांना काहीतरी आमीष दाखवून यातील एका मुलीवर अत्याचार केला. तर दुसरीची छेड काढली. यातील एका मुलीने हापसे याने अत्याचार केला असल्याचा जबाब दिला आहे. पोलिसांनी तिघींचे जबाब नोंदवले आहे.

घटना घडल्यानंतर दुसर्‍या दिवशी हापसे याने या मुलींना नगरच्या रेल्वेस्थानकावर सोडत पैसे देऊन रेल्वेने हैद्राबाद येथे जाण्यास सांगितले. त्यानंतर त्या तिघी हैदराबाद येथे गेल्या. त्यानंतर पोलीसांनी त्यांना नगरला आणले असून त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमानंतर सर्वच चक्रावले आहेत. तिघींपैकी एकाच्या जबाबवरून आरोपी हापसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या