Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकशेतकर्‍यांना देणार गिर गायी, सानेन शेळ्या; दुग्ध व्यवसायाला मिळणार चालना

शेतकर्‍यांना देणार गिर गायी, सानेन शेळ्या; दुग्ध व्यवसायाला मिळणार चालना

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जादा दूध देणारी ‘गिर गायी व सानेन शेळी’मुळे राज्यात दुधाचे उत्पादन वाढण्याबरोबरच, दुग्ध व्यवसायातून मिळणार्‍या पैशांमुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे.

- Advertisement -

राज्य पशुधन विकास महामंडळांच्या माध्यमातून दिवसाला वीस लिटर दूध देणारी गिर जातीची गायी व दिवसाला दहा ते बारा लिटर दूध देणारी सानेन जातीची ‘शेळी’ विकसित करण्याचे काम मागील काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू आहे.

या कामात उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बायफ संस्थेचीही मदत घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना गिर जातीची गाई व सानेन जातीच्या शेळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. क्रीडा व पशू संवर्धनमंत्री सुनील केदार यांनी, आमदार अशोक पवार यांच्यासमवेत पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील बायफ (बायफ विकास अनुसधान प्रतिष्ठान) या संस्थेस भेट दिली. यावेळी सुनिल केदार यांनी बायफ संस्थेकडुन गिर गाई व सानेन शेळीवर करण्यात येत असलेल्या संशोधनाबाबत माहिती घेतली.

मब्राझीलफ या देशाने सुमारे वीस वर्षांपूर्वी आपल्या देशातून गिर गाई नेल्या होत्या. मागील वीस वर्षाच्या काळात ब्राझील या देशातील संशोधकांनी गिर गायींवर वेगवेगळे प्रयोग करुन, गायींचे दूध प्रतीदिन वीस लिटरवर नेले आहे.

ब्राझील या देशाने विकसीत केलेली दिवसाला वीस लिटर दूध देणारी गिर जातीची गायी राज्यात आणून, आपल्याकडेही दिवसाला गिर गाई जास्तीत जास्त दूध कसे देईल याचे संशोधन पशुधन विकास महामंडळांच्या माध्यमातून मागिल काही महिन्यांपासुन सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे.

याच पध्दतीचे काम उरुळी कांचन येथील बायफ संस्थाही करत असल्याने या ठिकाणी भेट दिली. पशुधन विकास महामंडळ व बायफ संस्था एकत्र आल्यास, पुढील काही महिन्यातच वीस लिटर दुध देणार्‍या गिर गायी आपल्याकडेही शेतकर्‍यांच्या गोठ्यात दिसतील यात शंका नाही, असे केदार यांनी सांगितले.

यावेळी आमदार अशोक पवार, पशुधन विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. धनंजय परकाळे, बायफचे अध्यक्ष डॉ. गिरीष सोहनी, वरीष्ठ उपाध्यक्ष अशोक पांडे, व्ही. वाय. देशपांडे, डॉ. जयंत खडसे, डॉ. स्वामीनाथन आदी उपस्थित होते.

सानेन जातीची शेळी

बारा लिटरहून अधिक दूध देणारी सानेन जातीची शेळी सध्या कॅनडा देशात प्रसिद्ध आहे. ही शेळी आपल्या राज्यातील तापमानाला व वातावरणात टिकणार असल्याचे संशोधनातून पुढे आल्याने, पशुधन विकास महामंडळांच्या माध्यमातून आपल्याही राज्यात सानेन जातीची शेळीचे उत्पादन करण्याबाबत संशोधन सुरू आहे.

सानेन शेळीबाबतही बायफची मदत घेतली जाणार आहे. ही शेळी आपल्या राज्यात आल्यास, ग्रामीण भागातील शेतकरी सधन होईल. यामुळे गिर गायी बरोबरच सानेन जातीची शेळीही पुढील काही महिन्यातच राज्यात दाखल होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या