Thursday, April 25, 2024
Homeनगरघोडेश्वरी देवी मंदिरातील चोरीच्या तपासासाठी पुन्हा आंदोलन करणार

घोडेश्वरी देवी मंदिरातील चोरीच्या तपासासाठी पुन्हा आंदोलन करणार

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिरातून चांदीचे दागिने नेणार्‍या चोरट्यांचा एक महिना होत आला तरी तपास लागलेला नाही.

- Advertisement -

त्यामुळे ग्रामस्थ पुन्हा संतप्त झाले असून पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नुकत्याच झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी दिला आहे. आचारसंहितेमुळे आंदोलन करू नका अन्यथा गुन्हे दाखल करू असा इशारा यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी दिला असता ग्रामस्थांनी गुन्हे दाखल करून दाखवा असे आव्हान दिल्याने दागिने चोरीच्या प्रकरणावरून पोलीस व ग्रामस्थांमध्ये संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.

मंगळवार 15 डिसेंबर रोजी घोडेश्वरी देवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या बैठकीत पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला व याबाबतचे लेखी निवेदन सोनई पोलिसांना देण्यात आले.

दि. 19 नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभार्‍याचे कुलूप तोडून चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेला एक महिना झाला आहे. सोनई पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली होती. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

पण पोलीस कोठडी मिळवूनही या संशयित आरोपीकडून पोलिसांना काहीच निष्पन्न झाले नाही. तसेच चोरी गेलेले दागिने सापडलेले नाहीत. यापूर्वी ग्रामस्थांनी एकदा रास्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी संशयित आरोपी ताब्यात घेतल्याचे सांगून पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.

याला पंधरा दिवस होत आले असले तरी अजूनही खर्‍या चोराचा आणि दागिन्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे घोडेगाव ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाचा निर्धार केला आहे. निवेदन देताना ग्रामस्थांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली.

वैयक्तिक द्वेषातून टीका करणार्‍या व्यक्तीस पत्रकारांचे खडे बोल

बैठकीत व्यक्तिगत द्वेषातून वारंवार पत्रकारांवर घसरणारी ही व्यक्ती एकीकडे कोणाला प्रसिद्धी देऊ नका म्हणायची, पण प्रत्यक्षात गेल्या वेळच्या रस्ता रोको आंदोलनात मात्र फोटोत ‘झळकायला मिळावे’ म्हणून निवेदन देणार्‍या महिलांच्या मागे उभी होती, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यामुळे या ‘बोलबच्चन’ची चमकोगिरी उघड झाली. तुमचे वैयक्तिक द्वेष बाजूला ठेवा, अन् आम्हाला पत्रकारिता शिकवू नका, अशा शब्दांत पत्रकारांनी त्याला चांगलेच सुनावले.

देवीचे दागिने चोरीचा विषय ग्रामस्थांच्या अस्मितेचा आहे, यात राजकारण आणू नका, असे एक व्यक्ती तावातावाने म्हणत होती. तसेच आतापर्यंत पत्रकारांनी किती बातम्या लावल्या, असा जाब त्याने विचारला. आजवरच्या बैठकांमध्ये वारंवार ही व्यक्ती पत्रकारांना कोणाचेही नाव छापू नका असा आग्रह धरत होती. त्याला यावेळी पत्रकारांनी खडे बोल सुनावले.

…तर गुन्हे दाखल करु; पोलीस अधिकार्‍यांचा इशारा

सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे मंगळवारी सायंकाळी ग्रामस्थांच्या आवाहनानुसार मंदिराच्या आवारात आले. त्यांनी आचारसंहिता लागू असल्याने आंदोलन करु नका, असे आवाहन केले. तसेच जर आंदोलन केले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील असा इशारा दिला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले.

गुन्हे दाखल करा; ग्रामस्थांचे आव्हान

पोलिसांना चोर सापडत नाहीत, दागिने सापडत नाहीत आणि ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याचा धाक दाखवला जातो, यावरून ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गुन्हे दाखल करायचे असतील तर सर्वांवर गुन्हे दाखल करा, असे आव्हान देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या