Friday, April 26, 2024
Homeनगरसात महिन्यांनी फुलला घोडेगाव जनावरांचा बाजार

सात महिन्यांनी फुलला घोडेगाव जनावरांचा बाजार

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यापासून बंद असलेला नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव येथील जनावरांचा बाजार फुलल्याचे चित्र काल शुक्रवारी पहावयास मिळाले. करोना अनलॉक नंतर सुरू झालेल्या पहिल्याच बाजारात सुमारे 3400 जनावरे विक्रीसाठी आली होती. या जनावरांच्या खरेदी-विक्रीतून अडीच कोटींच्या दरम्यान उलाढाल झाली आहे.

- Advertisement -

नेवासा बाजार समिती अंतर्गत असलेला घोडेगावचा जनावरांचा बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. करोनामुळे मार्च 2020 पासून बंद आलेला घोडेगावचा जनावरांचा बाजार सुरू करण्याचे शासन निर्णयानंतर शुक्रवार दि.23 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच भरला. नेवासा बाजार समिती प्रशासनाकडून कोरोना सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. बाजार आवराचे मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, विनामास्कची व्यवस्था करून येणाऱ्या शेतकरी, व्यापारी यांची तपासणी करण्यात आली.

बाजरात शेळी, मेंढी, गाई , म्हैस, बैल बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आली होती. बाजारच्या पहिल्याच दिवशी जनावरांची खरेदी विक्री झाली. बाजार सुरू झाल्याने व्यापारी, शेतकरी, छोटे मोठे व्यवसायिक यांना दिलासा मिळाला आहे. हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटणार असल्याने बाजारात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसला.

बाजारात शुक्रवारी हजारो जनावरे विक्री साठी आली होती.शेळी-मेंढी बाजारात मोठी हालचाल दिसली. परंतु बाहेर गावचे गिऱ्हाईक कमी असल्याने मोठ्या जनावरांची विक्री संथ गतीने होत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली जनावरे पुन्हा परत न्यावी लागली.

आज विक्रीसाठी बाजारात आलेली जनावरे अशी…

शेळी मेंढी,बोकड – 2500

म्हैस – 500

वगारी – 150

कारवडी – 50

गाई – 100

बैल – 100

असे एकूण लहान मोठे 3400 जनावरे विक्री साठी आली होती परंतु यातील अर्धी जनावरे विक्रीअभावी वापस गेली.

घोडेगावचा आठवडे भाजीपाला बाजार ही भरला होता. शेतकरी मोठ्या संख्येने भाजीपाला विक्रीसाठी आले होते. अनेक लहान मोठे व्यवसायिकांनी बाजारात आपली दुकाने थाटली होती. बाजारतळावरून वाहणाऱ्या पत्रवाळी नदीला पाणी असल्याने बाजारात बसण्यासाठी जागा कमी पडली. त्याच बरोबर महिलांना पाण्यातून चालत जात बाजार करावा लागल्याने बाजार करूंचे काही प्रमाणात हाल झाले.

करोना लॉकडाऊन नंतर तब्बल 7 महिन्यांनी जनावरांचा बाजार भरला असल्याने हा पहिलाच बाजार नेहमीपेक्षा 30 ते 35 टक्केच बाजार भरला. करोना संसर्ग टाळण्यासाठी बाजार समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली सर्व ती उपाय योजना करण्यात आली होती.

देवदत्त पालवे (सचिव,नेवासा बाजार समिती)

- Advertisment -

ताज्या बातम्या