Friday, April 26, 2024
Homeजळगावगझल मध्ये दृष्टीचा व भावनांचा परिपाक असतो !

गझल मध्ये दृष्टीचा व भावनांचा परिपाक असतो !

चोपडा – प्रतिनिधी Chopada

गझल हा तंत्रानुगामी साहित्य प्रकार आहे. गझल समजायला सोपी असली तरी समीक्षकांच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. गझलेवर फारसे समीक्षणात्मक लिहिले जात नाही. पण गझल ही रसिक मनाचा ठाव घेणारी असते. गझल मधील दोन ओळींचा शेर म्हणजे गझलकाराचा एकूणच आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टीचा, भावनांचा परिपाकच असतो आणि नेमके हेच…

- Advertisement -

‘गझलाई’ या पुस्तकात अलगदपणे उलगडून दाखवलेले आहे. गझलाई हे पुस्तक गझलेच्या संदर्भात संशोधनासाठी एक मार्गदर्शक ग्रंथ असल्याचे चोपडा येथील सुप्रसिद्ध गझलकारा, कवयित्री तथा अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य प्रा.सौ.योगिता नितीन पाटील यांनी पुस्तकाचे अंतरंग उलगडतांना सांगितले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा-चोपडा तर्फे आयोजित ‘मसाप गप्पा’ या ऑनलाईन उपक्रमात त्या जेष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या ‘गझलाई’ या पुस्तका बाबत बोलत होत्या. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, गझल मध्ये नजाकत, कोमलता आहे.

गझलेमध्ये तंत्र सांभाळूनही नादमयता साधलेली असते. गजलेचे वृत्त (बहर), यमक (काफिया), अंत्ययमक (रदिफ) हे मुख्य भाग (जमीन) आहेत. जेष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलाई या पुस्तकात महाराष्ट्रातील अनेक नामवंत आणि नवोदित गझलकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. यातून गझलकारांच्या शैलीचा आपल्यास परिचय होतो. एकाच व्यासपीठावर अनेक दमदार गझलकारांना ऐकणे ही पर्वणी असते. अगदी असाच अनुभव श्रीकृष्ण राऊत यांनी संकलित केलेले ‘गझलाई’ हे पुस्तक वाचताना येतो.

वृत्तपत्रात प्रकाशित लेखांचा हा संग्रह म्हणजे अगदी कोणतेही पान उघडा आणि एका नव्या गझलकाराची ओळख व त्याच्या उत्तम शेरांचा आस्वाद घ्या ! अशी दुहेरी मेजवानी देणारा आहे.

‘बांधू कसे बंधनात त्याला

बेबंद वाहणारा तो मुक्तछंद वारा’

या आपल्याच एका शेरमधून अलवार भावना व्यक्त करणाऱ्या प्रा. सौ.योगिता पाटील यांनी ‘गझलाई’ या समिक्षणात्मक पुस्तकातील ४७ गझलकारांपैकी काही गझलकारांच्या लेखनशैलीचा परिचय उपस्थितांना करून दिला.

खानदेशातील प्रसिद्ध साहित्यिक कमलाकर देसले (झोडगे) यांच्यावरील लेखात राऊत म्हणतात की ‘जी लोक हृदयाने विचार करतात त्यांचे वय वाढले, शरीरावर सुरकुत्या आल्या तरीही त्यांच्या अंतःकरणावर कधीच सुरकुत्या पडत नाही.’ तर निलेश कवडे या नव्या दमाच्या गझलकाराने शिक्षकांची आपबिती एका शेरमध्ये समर्पक रीतीने मांडली आहे.

तो म्हणतो…

‘वाहतो ओझे किती मी अपेक्षांचे

एकदा मोजून घ्या वजन दप्तराचे’

एकट्या झालेल्या माणसाची कैफियत मांडण्यासाठी श्रीकृष्ण राऊत,

‘सांजवेळी संगतीला एक नाही पाखरू

तेरवीच्या पंगतीला खूप आली माणसे

या शेरमधुन व्यक्त होतात.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद वैद्य, प्रास्ताविक कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी तर आभार प्रदर्शन पंकज शिंदे यांनी केले. प्रारंभी शाखेचे प्रमुख कार्यवाह संजय बारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी मसाप चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष कविवर्य अशोक सोनवणे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमास मसाप सदस्य व अन्य रसिकही उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या