Saturday, April 27, 2024
Homeनगरघाटघर जलविद्युत उदंचन प्रकल्पाचे जनरेटरसह पोलांची चोरी

घाटघर जलविद्युत उदंचन प्रकल्पाचे जनरेटरसह पोलांची चोरी

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

अकोले तालुक्यातील घाटघर या ठिकाणी घाटघर जलविद्युत उदंचन प्रकल्पाचे अवाढव्य असे जनरेटर चोरीला गेले असून या जनरेटरसोबत रोडवरील प्रकल्पाचेच उभे पोलदेखील अज्ञात चोरट्यांनी कापून नेले असल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

अकोले तालुक्यातील घाटघर येथे घाटघर जलविद्युत प्रकल्पाचे 65 केव्ही क्षमतेचे जनरेटर काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले असल्याची घटना घडली आहे. पंरतु आता जनरेटर ज्या ठिकाणावरून चोरीला गेले त्याच परिसरात चोरट्यांनी जलविद्युत प्रकल्पाचेच उभे असलेले विजेचे पोलसुद्धा कापून चोरून नेले आहे. या जलविद्युत प्रकल्पाच्या कोकणकड्याजवळील ठिकाणावर कोणीही कर्मचारी रात्रीचा पहारेकरी म्हणून घाटघर जलविद्युत प्रकल्पाकडून नेमण्यात आलेला नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतलेला दिसतो. या व्यक्तीरीक्त प्रकल्पाचेच विश्रामगृहाचे दरवाजे व आतील काही फर्निचरही गायब आहे.

राजूर पोलिसांकडे फक्त प्रकल्पाने तक्रार वजा अर्ज दाखल केला आहे. तोही अर्ज फक्त जनरेटर चोरीचाच आहे. जर इतरही साहित्य चोरीला गेलेले असताना मग त्यासंदर्भात तक्रार का दाखल केली गेली नाही ? जो काही मुद्देमाल चोरीला गेला आहे तो माहीतगार व्यक्तीकडूनच चोरीला गेला असल्याची पाल चुकचुकत आहे. किंवा कुंपणच तर शेत खात नाही ना? हाही प्रश्न उपस्थित होत आहे. या अगोदर घाटघर जलविद्युत प्रकल्पाला भंडारदरा कार्यालयात अधिकारी नेमलेले होते.

तेव्हा सर्व काही अलबेल होते. पंरतु सदर अधिकार्‍यांची वरच्या पदावर बढती झाल्याने ते नाशिक येथे हजर झाले. त्यांच्या जागेवर ठाणे ऑफीस मधून अधिकारी देऊनही ते ठाण्यातूनच सदर प्रकल्प कार्यालयाचा कारभार पाहत आहेत. इतक्या चोर्‍या होऊनही अधिकार्‍यांनी झोपेचे सोंग घेतलेले दिसून येत असून चोरी झालेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट सुद्धा दिली नाही. प्रकल्प कार्यालयाचा सर्व कारभार घाटघर जलविद्युत प्रकल्प, भंडारदरा, उपविभाग क्रमांक 3 येथील एका कर्मचार्‍याच्या हातात दिला आहे.

राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

65 केव्ही जनरेटर व लोखंडी पोल हे सहजरित्या घेऊन जाणे शक्य नसून ते चारचाकी वाहनातून किंवा ट्रॅक्टर मधूनच नेणे शक्य असून ते नेण्यासाठी साम्रद, रतनवाडी, मुतखेल किंवा पांजरे, मुरशेत मार्गेच घेऊन जाता येऊ शकते या दोन्ही मार्गावर वनविभागाचे चेकपोस्ट असताना देखील धाडसी चोरी झाली कशी? याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या