Thursday, April 25, 2024
Homeनाशिक‘घरकुल’ वाटपास टाळाटाळ; माजी महापौरांसह नगरसेवकांचे मनपात ठिय्या आंदोलन

‘घरकुल’ वाटपास टाळाटाळ; माजी महापौरांसह नगरसेवकांचे मनपात ठिय्या आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी

म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेतील तयार घरकुलांचे लाभार्थींना वाटप तसेच झोपडपट्टींचे स्थलांतर करण्यास मनपा प्रशासनातर्फे होत असलेल्या टाळाटाळीमुळे त्रस्त झालेल्या सत्तारूढ गटास आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. काँग्रेसचे माजी महापौर शेख रशीद यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्त्यांनी उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल जोरदार घोषणा देत मनपा परिसर दणाणून सोडण्यात आला होता…

- Advertisement -

तब्बल दिड तास सुरू असलेले हे आंदोलन उपायुक्त नितीन कापडणीस यांनी 9 फेब्रुवारीपासून झोपडपट्टी स्थलांतर व घरकुल वाटपाच्या प्रक्रियेस प्रारंभ केला जाईल. तसेच प्रलंबित घरांची कामे देखील तातडीने मार्गी लावले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.

म्हाळदे योजनेत अनेक घरकुले तयार आहेत. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे लाभार्थींना या घरांचे वाटप होत नाही. त्यामुळे रस्त्यावर झोपडपट्टींचे देखील स्थलांतर होत नसल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा कायम राहून जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.

तयार घरकुलांचे वाटप व्हावे अशी मागणी सातत्याने केली जात असतांना देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे आंदोलन हाती घ्यावे लागल्याचे माजी महापौर शेख रशीद यांनी स्पष्ट केले.

मनपातर्फे सर्व्हेक्षण झालेल्या सर्व लाभार्थींचे अद्याप घरकुल योजनेत स्थलांतर झालेले नाही. जाफरनगर, मुकूंदवाडी, पाट कॅनॉल, राहुलनगर आदी भागातील झोपडपट्टी धारकांना घरकुलांचे वाटप करण्याची कार्यवाही तातडीने झाली पाहिजे.

तसेच काही घरकुलांची कामे प्रलंबित असल्याने ती तातडीने पुर्ण होणे गरजेचे असतांना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र या संदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली. आयुक्तांबरोबर बैठका देखील घेतल्या गेल्या.

मात्र कार्यवाही होत नाही. 1 हजार 880 घरे तयार आहेत मात्र त्यांचे वाटप लाभार्थींना केले जात नाही व रस्त्यावरील झोपडपट्टींचे अतिक्रमण देखील काढले जात नाही.

त्यामुळे उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करावे लागत असल्याची टिका शेख रशीद यांनी केली. उपायुक्तांनी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेत आहोत मात्र आठ दिवसात कार्यवाही दिसून न आल्यास आपण बेमुदत उपोषण करू, असा इशारा त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

या आंदोलनात नगरसेवक निहाल हाजी, सलीम टॅक्सीवाले आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपायुक्त नितीन कापडणीस, शहर अभियंता कैलास बच्छाव आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या